श्रीवर्धन : भारत चोगले
नगरपरिषद निवडणूक 2025 साठी अखेरच्या दिवशी झालेल्या धावपळीमुळे सर्वच प्रभागांत जोरदार अर्ज दाखल झाले. श्रीवर्धन नगरपालिकेतील 20 सदस्य पदांसाठी तब्बल 68 उमेदवार मैदानात उतरले आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवारांनी अर्ज भरत निवडणुकीची रंगत कमालीची वाढवली आहे.
तहसीलदार मा. महेंद्र वाकलेकर हे निवडणूक निर्णय अधिकारी असून, जीवन पाटील व मनोज माने हे सहाय्यक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. नगराध्यक्षपदासाठी खालील उमेदवार रिंगणात सातनाक जितेंद्र प्रभाकर - राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीवर्धनकर अक्षता प्रितम - शिवसेना, चौगुले अतुल अरविंद - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), चौलकर रवींद्र पोशा - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), घोडमोडे रामचंद्र शांताराम - अपक्ष नगराध्यक्षपद हे एका जागेवर असलेले सर्वात प्रतिष्ठेचे पद असल्याने या पाच उमेदवारांमध्ये टक्कर अधिकच रोचक होणार आहे.
प्रभागनिहाय उमेदवारांची यादी निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आली असून, एकाच प्रभागातून 3 ते 4 उमेदवार उतरल्याने तिरंगी-चौकडी लढतीची शक्यता अधिक दिसून येते. आजच्या अंतिम दिवसानंतर श्रीवर्धनचे राजकारण अक्षरशः तापले आहे. सर्वांच्या नजरा आता अर्ज मागे घेणे आणि थरारक निवडणूक प्रचारावर खिळल्या आहेत.
20 प्रभागांमध्ये 68 उमेदवार
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), उबाठा गट, काँग्रेस, भाजप आणि अपक्ष अशा सर्वच गटांचे उमेदवार आज अंतिम दिवशी मोठ्या संख्येने अर्ज भरत आपली ताकद दाखवून गेले. परिणामी श्रीवर्धन मधील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे.