Shrivardhan horse carriage news
श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धनच्या पर्यटन व्यवसायावर घोडागाडी हे एक आकर्षण ठरत असले, तरी पर्यटन व्यवसाय मंदावल्याने घोडागाड्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या अनेक घोडागाडी मालक पर्यटन बंद असल्याने आपल्या घोड्यांची जबाबदारी झटकून त्यांना मोकाट सोडत आहेत. याचा मोठा त्रास स्थानिक नागरिक, शेतकरी आणि बागायतदारांना सहन करावा लागत आहे.
मुख्य रस्त्यांपासून ते खाजगी बागायतींपर्यंत मोकाट फिरणार्या घोड्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस हे घोडे मालकीच्या शेतांमध्ये घुसून पिकांची नासधूस करत आहेत. यामुळे पोटापाण्याचा भाजीपाला व्यवसाय करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
दरवर्षी प्रमाणेच यंदाही नागरिकांकडून प्रशासनाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. मे महिना संपला असून आता पावसाळा सुरू होण्याआधीच या घोड्यांचा त्रास अधिक वाढण्याची शक्यता आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
श्रीवर्धनमधील अनेक पाखाड्यांमध्ये, मुख्य रस्त्यांवर, तसेच काही शासकीय कार्यालयांच्या परिसरातही हे मोकाट घोडे दिसून येत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. शिवाय, सार्वजनिक ठिकाणी ही जनावरे अडथळा निर्माण करत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
घोड्यांसाठी स्वतंत्र निवार्याची सोय, मालकांवर दंडात्मक कारवाई, तसेच पिकांचे नुकसान भरून देण्यासाठी यंत्रणा उभारली जाणे आवश्यक आहे. याशिवाय, पर्यटन हंगामात घोडागाडी व्यवसायासाठी काही नियमावली आखली गेल्यास, अशा समस्यांना रोखता येऊ शकते.
स्थानिक प्रशासनाकडून यावर्षी काही ठोस उपाययोजना राबवल्या जातात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी आशावाद व्यक्त केला असला तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे ही काळाची गरज आहे.