Shrivardhan power cut issue Pudhari
रायगड

Shrivardhan power cut issue: अंधारात ढकलले श्रीवर्धन; वारंवार वीज खंडित

घरगुती कामे, पिण्याच्या पाण्याची सोय, व्यापारी व्यवहार आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास या सर्वांवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

भारत चोगले

श्रीवर्धन: श्रीवर्धन शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वीज खंडितमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उकाड्याच्या कडाक्यात अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. घरगुती कामे, पिण्याच्या पाण्याची सोय, व्यापारी व्यवहार आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास या सर्वांवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.

महावितरणकडून दर मंगळवारी देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली नियोजित वीज बंद ठेवली जाते. मात्र, त्यानंतरही इतर दिवशी तसेच रात्रीच्या वेळी वारंवार होणाऱ्या अनियमित वीज खंडितमुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. “दर मंगळवारी नेमकी कोणती कामे केली जातात, जर रोजच वीज जाते, असा रोखठोक सवाल नागरिक विचारत आहेत.

यंदा पर्यटन हंगाम जोरात सुरू असून श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि दिवेआगर या किनारी भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे हॉटेल, लॉज, होमस्टे तसेच स्थानिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. पर्यटकांनाही असुविधा सहन करावी लागत असल्याने पर्यटन व्यवसायाच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची भीती व्यक्त होत आहे.

अचानक वीज खंडित झाल्यामुळे फ्रीज, टीव्ही, संगणक यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना उकाड्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, ही बाब अधिक चिंताजनक आहे.

ऊर्जा पुरवठा हा मूलभूत नागरी हक्क मानला जात असताना, वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि त्यावरील विलंबित प्रतिसाद यामुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांकडून आता स्पष्ट अनियमित वीज खंडित तातडीने थांबवावी, तांत्रिक बिघाडांचे कायमस्वरूपी निराकरण करावे, नियोजित वीज बंदबाबत पारदर्शक आणि वेळेवर माहिती द्यावीदरम्यान, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर नागरिकांचा संताप आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.वीज ही गरज की लक्झरी? असा सवाल उपस्थित होत असताना, महावितरणने आता तरी जबाबदारीची जाणीव ठेवून ठोस कृती करणे अत्यावश्यक बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT