Shrivardhan Tourism Pudhari
रायगड

Shrivardhan Tourism: श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा पर्यटकांचा शुकशुकाट; पर्यटकांची संख्या घटल्याने हॉटेल व्यावसायिक चिंतेत

पर्यटन व्यवसायाला पुन्हा तेजी येण्याची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

अनिकेत मोहित

श्रीवर्धन: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सलग सुट्ट्यांचा योग जुळून आल्याने श्रीवर्धनच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली होती. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची लगबग, हॉटेलमध्ये वाढलेली वर्दळ आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायांमध्ये निर्माण झालेली आर्थिक उलाढाल यामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

मात्र, सुट्ट्यांचा कालावधी संपताच पर्यटकांची संख्या पुन्हा घटू लागल्याने समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट जाणवू लागला आहे. पर्यटकांच्या घटत्या संख्येमुळे हॉटेल व्यावसायिकांसह पर्यटनावर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.

श्रीवर्धन हे कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. विस्तीर्ण समुद्रकिनारा, निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि शांत वातावरण यामुळे राज्याच्या विविध भागांतून पर्यटक येथे येत असतात.

विशेषतः शनिवार-रविवार आणि सलग सुट्ट्यांच्या काळात पर्यटकांची संख्या वाढते. ऑक्टोबरच्या सुरुवातीला सलग सुट्ट्या मिळाल्याने अनेक पर्यटकांनी श्रीवर्धनकडे धाव घेतली होती. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची वर्दळ वाढली होती, तर हॉटेल, लॉजिंग, खानावळी आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही चांगली गर्दी पाहायला मिळाली.

या गर्दीमुळे पर्यटन व्यवसायाला काही प्रमाणात चालना मिळाली होती. हॉटेलमध्ये खोल्यांची मागणी वाढली होती, तर स्थानिक व्यावसायिकांनाही ग्राहकांची वाढती संख्या दिलासा देणारी ठरली होती. मात्र, सुट्ट्या संपल्यानंतर परिस्थिती बदलली असून, समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वी पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेला परिसर आता तुलनेने शांत दिसू लागला आहे.

पर्यटकांची संख्या कमी झाल्याने हॉटेलमधील खोल्यांची मागणी घटते, तसेच खाद्यपदार्थ आणि इतर सेवांच्या विक्रीवरही परिणाम होतो. त्यामुळे आगामी शनिवार-रविवार, सणासुदीच्या सुट्ट्या आणि पर्यटन हंगामातील गर्दीकडे व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

सुट्ट्यांच्या काळात पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेला श्रीवर्धनचा समुद्रकिनारा आता पुन्हा पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे. आगामी काळात पर्यटकांची संख्या वाढून पर्यटन व्यवसायाला पुन्हा तेजी येते का, याकडे स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटनाशी संबंधित घटकांचे लक्ष लागले आहे.

पर्यटन हंगामाकडे नजरा

श्रीवर्धनच्या पर्यटन व्यवसायाला वर्षभर चालना मिळण्यासाठी केवळ सलग सुट्ट्यांवर अवलंबून न राहता पर्यटकांचा नियमित ओघ टिकवणे आवश्यक आहे. समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, सुरक्षितता, मूलभूत सुविधा, वाहनतळ व्यवस्था आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या उपक्रमांवर भर दिल्यास पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळू शकते. त्याचबरोबर श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, हरिहरेश्वर यांसारख्या पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

व्यवसायांवर परिणाम

श्रीवर्धनमधील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. हॉटेल, लॉजिंग, खानावळी, चहा-नाश्त्याची दुकाने, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच पर्यटकांना विविध सुविधा पुरविणाऱ्या व्यावसायिकांना पर्यटकांच्या संख्येवर अवलंबून राहावे लागते. सुट्ट्यांच्या काळात वाढणारी गर्दी आणि त्यानंतर अचानक कमी होणारी वर्दळ यामुळे व्यवसायात सातत्य राखणे व्यावसायिकांसमोर आव्हान ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT