रायगड

शिवराज्याभिषेक सोहळा शासनामार्फत तिथीप्रमाणेच होणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मोहन कारंडे

इलियास ढोकले /श्रीकृष्ण बाळ : छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा तिथीनुसारच शासनामार्फत केला जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज किल्ले रायगडावर केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एक सहस्त्र सुवर्णमुद्रांचा अभिषेक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर करण्यात आला. राज्यातील विविध नद्यांमधून आणलेल्या जलाचा जलाभिषेक छत्रपतींना करण्यात आला. रायगड पोलीस दलातर्फे राजदरबारात छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांच्या आदर्शावर चालणारे महाराष्ट्र राज्य असून त्यांच्या आशीर्वादानेच राज्य पुढे जात आहे. छत्रपतींचा राज्याभिषेक या स्वराज्यामध्ये झाला, असा राजा कधीही होणे नाही, अशा शब्दात त्यांनी छत्रपतींच्या कार्याचा गौरव केला. रयतेचे राज्य निर्माण करणारा राजा म्हणून छत्रपतींकडे पाहिले जाते. राज्यात होणारे सर्व कार्यक्रम हे छत्रपतींच्या प्रतिमेशिवाय होत नाहीत. या वास्तवातूनच त्यांचे असलेले महत्त्व अधोरेखित होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिवरायांची वाघनखे आणण्याचा संकल्प पूर्ण होणार : मुनगंटीवार

मंदिराचे रक्षण व स्वाभिमानाचे रक्षण छत्रपतींनी केले असे सांगून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपतींची वाघनखे व भवानी तलवार आणण्याचा केलेला संकल्प येत्या काळात पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. १४ किल्ल्यांचा इतिहास युनेस्कोमध्ये सादर झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवभक्तांनी विशाळगड व संबंधित किल्ल्यांसंदर्भात दिलेली निवेदने स्वीकारली असून याबाबत योग्य कार्यवाही करू, असा विश्वास व्यक्त केला.

शिवरायांचे राज्य रयतेचं राज्य होते : अजित पवार

छत्रपती शिवरायांच्या काळात असलेल्या विविध राजवटींची ओळख निजामशाही, आदिलशाही अशा पद्धतीने होत असताना छत्रपतींचे राज्य मात्र रयतेचे राज्य म्हणून ओळखले गेले. छत्रपतींच्या कार्याचा वारसा केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशातील जनतेने अंमलात आणावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. छत्रपतींनी शक निर्माण करून 'शककर्ते' अशी आपली ओळख जगाला करून दिल्याचे त्यांनी सांगितले.

शिवरायांचा धनुष्यबाण असलेला पुतळा उभारणार : सामंत

पालकमंत्री उदय सामंत यांनी रायगड जिल्ह्यातील उंबरखिंड येथे छत्रपती शिवरायांचा हातात धनुष्यबाण असलेला पूर्णाकृती पुतळा उभारण्याची घोषणा केली. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ५० कोटी रुपये खर्च होऊन शिवसृष्टीची निर्मिती केली जाईल, असेही जाहीर केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT