Raigad Fort Shivrajyabhishek Din
किल्ले रायगड : पुढारी वृत्तसेवा
किल्ले रायगड पुन्हा एकदा शिवभक्तांनी फुलून गेला आहे. जागोजागी भगवे ध्वज घेऊन मुखातून शिवनामाचा जयघोष करत गडावर पायी जाणाऱ्या शिवभक्तांचा जत्था नजरेत पडताना दिसतोय. मृग नक्षत्राचा रविवारी सकाळी प्रारंभझाल्याने अधूनमधून येणारी पावसाची सर अंगावर झेलत शिवभक्त किल्ल्याकडे मार्गक्रमण करताना दिसत आहेत. निमित्त आहे सोमवारी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे. या कार्यक्रमासाठी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आयोजकांच्या माध्यमातून जोरदार तयारी केली आहे. त्याची पाहणी करत तयारीबाबत आढावाही त्यांनी घेतला.
दरवर्षी किल्ले रायगडावर तारखेनुसार ६ जून आणि तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा थाटात साजरा केला जातो. या दोन्ही सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होतात. सोमवारी साजऱ्या होत असलेल्या तिथीनुसारच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी राज्याच्या कानोकोपऱ्यातून हजारो शिवभक्त दाखल होत आहेत. त्यात लहान मुलांपासून वृद्धापर्यंतचा समावेश आहे.
शिवछत्रपतींना अभिवादन करण्यासाठी हे शिवभक्त किल्ल्यावर येत आहेत. सोमवारपासूनच या शिवभक्तांचे आगमन होऊ लागलेले आहे. त्यांच्यासाठी अन्नछत्रांमध्ये पंगती पडत आहेत. पाण्याचीही मुबलक सोय करण्यात आली असल्याने शिवभक्तांकडून समाधान व्यक्क्त केले जात आहे. आरोग्य सुविधांसह वैद्यकीय पथके जागोजागी तैनात करण्यात आ-लेली आहेत. शिवभक्तांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी आयोजकांच्या माध्यमातून घेतली जात आहेत.
गडदेवता असलेल्या शिरकाई देवीची रविवारी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. तसेच देवीचा गोंधळ साजरा झाला. गळ्यात संबळ घालून घालून देवीच्या भुत्यांनी देवीची सुंदर कवणे सादर केल्याने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. या गोंधळानंतर शिवमूर्तीची पालखीतून वाजतगाजत गडावरुन मिरवणूक काढण्यात आली. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषांनी रायगडचा परिसर दणाणून गेला. ढोल, ताशांचा निनाद, हलगीचा कडकडाटातात शिवाजी महाराजांची पालखी राजदरबारात दाखल होताच पुन्हा एकदा शिव ललकार उमटला आणि जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करीत उपस्थित शिवभक्तांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले.
संध्याकाळी आयोजकांच्यावतीने पालखीतून आणलेल्या शिवमूर्तीची तुला करण्यात आली. धान्यासह शैक्षणिस साहित्याचीही तुला करुन नंतर त्या साहित्याचे वाटप करण्यात आले. रात्री उपस्थित शाहिरांनी आपल्या पहाडी आवाजातून शिवशाहीचा इतिहास पोवाड्यातून मांडत शिवप्रभूना अनोखे अभिवादनही केले. आता सर्वांनाच वेध लागलेत ते सोमवारच्या पहाटेचे. तिथीनुसार साजऱ्या होत असलेला राज्याभिषेक सोहळा याचि देही, याचि डोळा नजरेत साठवून ठेवण्यासाठी सारेच आतूर झालेले आहेत.
नाते: मागील वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी विधानसभेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळात समावेश व्हावा असा शिवसैनिकांनी केलेल्या नवसाची पूर्तता आज श्री शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला मंत्री भरत शेठ गोगावले यांनी केली. शेकडो शिवसैनिक पदाधिकारी शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये मंत्री भरत शेठ गोगावले यांनी शिरकाई मातेचा आशीर्वाद घेऊन केलेल्या नवसाप्रमाणे देवीला गोड पदार्थ अर्पण करण्यात आले. याप्रसंगी श्री पंचाक्षर माहेश्वर जंगम पौरोहित्य मंडळाचे मान्यवर पुरोहित उपस्थित होते. उपस्थित शिवसैनिकांनी शिरकाई देवीच्या नावाने तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला.