उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे दर्शन होणार आहे. हा अर्धाकृती पुतळा सुमारे 12 फुटी असून, हा पुतळा बसविण्यासाठी सर्व तांत्रिक व कायदेशीर बाबी सिडको मंडळ पूर्ण करत आहे. हा पुतळा उभारण्यासाठी शिल्पकाराचा शोधही पूर्ण झाला असून, या पुतळ्याचे काही काम सुरू झाले आहे.
युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील एक अशा 12 किल्ल्यांचा समावेश झाला. युनेस्कोच्या घोषणेनंतर 12 जुलैला राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी कामाची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी या जमानतळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची सूचना सिडको आणि अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली होती. या सूचनेनुसारच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी विमानतळ सुरू होण्याच्या मुहूर्तावर या पुतळ्याचे दर्शन प्रवाशांना घेता येईल अशा वेगाने कामाची आखणी केली.शिल्पकार नितीन रोहिदास गोरडे यांच्या आकार आर्ट स्कल्प्बर या कंपनीला हे शिल्प उभारण्याचे काम विले आहे.
पहिल्या दिवशीच पुतळ्याचे अनावरण
या पुतळ्याचे काम अंतिम टप्यात असून, 25 डिसेंबरला या विमानतळावरून पहिल्या उड्डाणासाठी विमानतळामध्ये येणाऱ्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे दर्शन घेता येईल, असे नियोजन सिडकोने केले आहे.
या पुतळ्ळ्यासाठी लागणारी परवानगी सार्वजनिक बांधकाम विभाग, रायगड जिल्हाधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडून मिळाल्याचे वृत्त आहे. शिल्पकार नितीन गोरडे यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे बनविले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना सम्मानितसुद्धा करण्यात आले आहे.