

पनवेलः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या विमान उड्डाणापूर्वी दिबासाहेबांचे नाव दिले जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे वने मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बुधवारी नागपूर येथे चर्चा भेट घेतली.
लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ नामकरणाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण सकारात्मक असल्याचे आणि या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला आश्वस्थ केले आहे असे सांगितले आहे. मुख्यमंत्री लवकरच त्याबाबतचा निर्णय देणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसार माध्यमांना दिली. यावेळी त्यांच्यासमवेत लोकनेते दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आ. किसन कथोरे, आमदार महेश बालदी, तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिष्टमंडळाच्यावतीने बोलताना सांगितले की, लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या 25 डिसेंबरला खुला होणार आहे. तो खुला होण्याच्या आधी राज्य सरकारने या विमानतळाला घोषित केलेले लोकनेते दि. बा. पाटील हे नामकरण किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेतील दिबांच्या नावाचा नामविस्तार व्हावे या दृष्टिकोनातून फडणवीस यांची मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली.
विमानतळावर पहिले उड्डाण होण्याआधी या विमानतळाचे दिबासाहेबांच्या नावाने नामकरण झाले पाहिजे यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांमध्ये मागणी व अस्वस्था आहे आणि ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलनांची घोषणा होत आहे. अशावेळेला या विमानतळाला दिबासाहेबांचे नाव पहिले उड्डाण होण्यापूर्वी लागले पाहिजे ही प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांची तळमळ आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांचे विमानतळाला लावण्यासाठी झालेल्या अनेक मोर्चे, आंदोलन संघर्षात आम्हा सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे सांगीतले.
सगळ्यात जास्त तळमळ आमच्यामध्ये प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांमध्ये असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसार माध्यमात नमूद केले. त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्ही सर्वानी भेट घेत उड्डाणापूर्वी दिबासाहेबांच्या नावाने विमानतळाचे नामकरण झाले पाहिजे अशी पुनर्मागणी केली. नेमके त्याच्या आधी होईल का सांगता येणार नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वस्थ केले आहे त्यामुळे विमानतळाला दि. बा पाटील साहेबांचे नाव लागणारच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
या यासंदर्भात त्यांनी प्रेस स्टेटमेंट द्यावे अशी आमच्या शिष्टमंडळाने विनंती केली, त्यावर त्यांनी या संदर्भामध्ये लवकरच यथायोग्य प्रेस स्टेटमेंट देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री महोदय आपली प्रेस स्टेटमेंट देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांमधील संदिग्धता मिटवतील अशी अपेक्षा आहे. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला दिबासाहेबांच्या नावाचे नामकरण होईल त्या वेळेला विजयी उत्सव आम्ही साजरा करू असेही यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले.
विरोधकांच्या वक्तव्यावर विचारलेल्या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले खरं तर ज्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी आंदोलनात भाग घेतला त्यांना या संदर्भात जाब विचारण्याचा अधिकार आहे. पण ज्यांनी दि. बा. पाटील साहेबांचे नावही घेतले नाही कारण त्यांना त्यावेळी दिबासाहेबांच्या नावाची काविळ होती आणि राजकारणात तर फार आधीपासून असताना यापूर्वी झालेल्या आंदोलनात ते कुठेही दिसले नाहीत,अशी विचारणाही त्यांनी केली. उलट हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले जावे याच्यापुढे ते शब्दही काढत नव्हते अशांना तर आम्हाला कुठलाही प्रश्न विचारायचा अधिकार नाही, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोखठोकपणे स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांचा शब्द अंतिम
ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शब्द आहे सांगतात आणि तसे आश्वस्थ करतात तो आमच्यासाठी अंतिम आहे. पंतप्रधांनांना या संदर्भात भेटणार का असा पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही प्रयत्न करायचे आहेत ते सर्व प्रयत्न करू, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिष्टमंडळाच्या वतीने स्पष्ट केले.