Vijaydurg fort pudhari photo
रायगड

Magic Connectivity project : शिवकालीन जलदुर्गाना समुद्रमार्गे जोडणार 'मॅजिक कनेक्टिव्हिटी'

महत्त्वाकांक्षी योजना : शिवकालीन आरमार ते आधुनिक जलमार्ग, हेरिटेज पर्यटनाचे नवे दूत ठरणार किल्ले

पुढारी वृत्तसेवा

रायगड : जयंत धुळप गोव्यासह पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळवणाऱ्या कोकण किनारपट्टीच्या ऐतिहासिक जलदुर्गांना समुद्रामार्गे मॅजिक कनेक्टिव्हिटी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पर्यटनाचे नवीन सागरी सर्किट कुलाबा ते किल्ले विजयदुर्ग असा हा जलप्रवास लवकरच सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा राज्याच्या साम्राज्यात सागरी आरमार हे कुलाबा ते विजयदुर्ग या ७२० किमीच्या किनारपट्टीवर उभे राहिले होते. कुलाबा येथे सरखेल कान्होजीराजे आंग्रे आणि विजयदुर्ग येथे असलेले आनंदराव धुळप या मराठा राज्याच्या शिलेदारांनी या किल्ल्यांना आपल्या कर्तृत्वातून नवी ओळख दिली होती. हेच किल्ले आता हेरिटेज पर्यटनाचे नवे दूत ठरणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आखली जात आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या सुमारे ७२० किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावरील ऐतिहासिक जलदुर्गांना 'जलदूत' वा 'सागरमाला' आणि सागरी पर्यटन (कुझ अँड वॉटरवेज टूरिडाम) या संकल्पनांतर्गत समुद्रमार्गाने जोडण्याचे धोरणात्मक नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा आरमाराच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या जलदुर्गाच्या विकासाचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. परिणामी, सागरी किल्ल्यांना आगळी 'मॅजिक कनेक्टिव्हिटी' लाभणार असून कोकण किनारपट्टीतील येत्या काळात नवा पर्यटन आयाम प्राप्त होणार आहे.

रायगड, सिंधुदुर्ग व पालघरमधील किल्ल्यांचा समावेश

मॅजिक कनेक्टिव्हिटी योजनेत रायगड, सिंधुदुर्ग व पालघरमधील किल्ल्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग (मालवण) किल्ला, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग, जंजिरा, खांदेरी-उंदेरी किल्ले आणि वसई आणि अर्नाळा या किल्ल्यांना समुद्रामार्गे जोडण्यात येईल. रस्ते वाहतुकीला एक सक्षम, जलद आणि निसर्गरम्य पर्याय म्हणून जलवाहतुकीचा विकास करणे, ऐतिहासिक वारसा जतन हेतूने पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या महसुलाचा वापर त्याच किल्ल्यांच्या डागडुजी व दीर्घकालीन संवर्धनासाठी करणे, बोट वाहतूक, व्यावसायिक गाईडस्, होमस्टे आणि कोकणी खाद्यसंस्कृतीच्या माध्यमातून स्थानिक मच्छीमार व तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे, किल्ल्यावर वर्दळ वाढल्याने सागरी सुरक्षेस मदत असे योजनेचे महत्त्वपूर्ण उद्देश आहेत.

पर्यटन सर्किट विकास

किल्ल्यांना जोडण्यासाठी किनारपट्टीची तीन प्रमुख टूरिस्ट सर्किटस्मध्ये विभागणी करण्याचे नियोजन आहे. ही सर्किटस् टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येतील. यातील पहिल्या उत्तर कोकण सर्किटमध्ये वसई, अर्नाळा, धारावी किल्ला, मढ या किल्ल्यांचा समावेश राहील. दुसऱ्या मध्य कोकण सर्किटमध्ये अलिबाग ते रत्नागिरी किनारपट्टीतील खांदेरी-उंदेरी, कोर्लई, मुरुड-जंजिरा, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग किल्ले, तर दक्षिण कोकण सर्किटमध्ये जयगड, पूर्णगड, विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग या किल्ल्यांचा समावेश राहील.

पायाभूत सुविधा विकास

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी किल्ल्यांजवळ फ्लोटिंग जेटी (तरंगते धक्के) उभारले जात आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) रो-रो सेवा आणि गेटेवे ते मांडवा (अलिबाग) कॅटमारान सेवेप्रमाणे मुंबई (भाऊचा धक्का), मांडवा, रेवस, दिघी, दाभोळ, जयगड आणि मालवण दरम्यान आधुनिक रो-रो आणि कॅटामारन सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सागरी पोलिस आणि जीवरक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.

शासकीय उपक्रम आणि सद्यस्थिती

हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी विविध स्तरांवर सरकारी योजनांचे एकत्रीकरण केले जात आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या अंतर्गत जलवाहतूक धोरणांतर्गत वसई, अर्नाळा, मुरुड-जंजिरा, अलिबाग आणि मालवण परिसरात फ्लोटिंग जेटी आणि प्रवासी बोट सेवेला निधी व मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या 'सागरमाला' आणि 'स्वदेश दर्शन' (कोस्टल सर्किट) योजनेंतर्गत कोकण किनारपट्टीच्या व बंदर विकासासाठी निधी उपलब्ध होत आहे. मालवण, तारकर्ली परिसरात जेट स्की, स्कूबा डायव्हिंग आणि कुझ सेवा सुरू करण्यासाठी खासगी कंपन्यांना परवाने दिले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT