Lord Shiva Temples Poladpur Shivharkalin
समीर बुटाला
पोलादपूर : तालुक्यातील ऐतिहासिक शिवकालीन शिवमंदिरसह इतर धार्मिक स्थळे पोलादपूरवासीयांचे पंचक्रोशीतील भक्ताचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्याच्या शनिवारीसह सोमवारी या महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात देवळे सवाद, लोहारे पोलादपूर शहर यासह इतर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असते.
महाबळेश्वरच्या अरण्यात महान यज्ञ करावयास सर्व ऋषी व देव बसले असताना ब्रह्मदेव हा यजमान होता. यज्ञाच्या सुरुवातीस मुहूर्त वेळ टाळू नये म्हणून ब्रह्मदेवाची दुसरी पत्नी गायत्री, ती सोवळे नेसून बाहेर आलेलीच होती, तेव्हा मुहूर्त साधण्यासाठी तिला ब्रह्मदेवाजवळ बसावयाची आज्ञादेऊन, ऋषिमंडळींनी संकल्प सांगून पुण्याहवचनाला सुरुवात केली. लगेच आपले नेसणे आटोपून व सज्ज होऊन सावित्री बाहेर आली आणि आपली सवत आपल्या पतीजवळ बसली असून यज्ञाला सुरुवातही झाली आहे हे दृश्य पाहून ती संतापली.
तिने या कृत्याचा जाब सर्व देवांना आणि ऋषीना विचारल. ती संतापाने म्हणाली, मुहूर्त कसा टळला असता? माझ्या आशेने माझे आटोपेपर्यंत सर्व ग्रह आणि तारे स्थिर राहिले असते पण हे सगळे तुमचेच कपट-कारस्थान आहे. माझ्या शक्तीचा सन्मान करून माझा अपमान करण्याच्या या तुमच्या कारवाईची मी तुम्हाली कधीच क्षमा करणार नाही. तुम्हाला याचे घोर प्रायश्चित्त भोगलेच पाहिजे. नंतर तिने सर्व देवांना तुम्ही नदीरूप व्हाल असा शाप दिली. त्या ऋषिमंडळीतही काही लोक तापट होते. त्यांनी मग तिलाही उलट शाप दिला की, 'तूही नदीरूप होशील. झाले. लगेच सावित्रीलाही नदीचे रुप प्राप्त झाले.देव नदीरूप घेऊन पूर्व समुद्राला मिळावयास वाहत निघाले, पण सावित्रीने त्यांना न अनुसरता पश्चिमेस खोल कड्यावरून उडी मारली आणि ती पश्चिम समुद्राला मिळण्या साठी निघाली.
तिचे हे कृत्य शंकराला मुळीच आवडले नाही. म्हणून त्याने तिची समजूत घालून तिला पूर्वेकडेच चलण्याचा आग्रह केला, शिवाय 'गंगा, गोदा वगैरे सर्व महान नद्या पूर्व समुद्रालाच मिळाल्या आहेत. हा पश्चिम समुद्र अपवित्र आहे, म्हणून तू त्याला मिळावयास जाऊ नको. तू येथून परत फिर, मी तुला डोंगर फोडून पूर्व सागराकडे जाण्यासाठी वाट देतो. अशा त-हेने शंकराने बार वेळा तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण तिने एकदाही त्याचे ऐकले नाही. महाबळेश्वरच्या पायथ्यापासून तो देवळे, कापडे, पोलादपूर, सवाद, काळसावित्री संगम, महाड वगैरे ठिकाणी व अखेरचे ठिकाण म्हणजे सावित्री जेथे पश्चिम समुद्राला मिळाली आहे तेथे हरिहरेश्वर रूपाने शंकराने अगदी आडवे पडून, सावित्रीला अडविण्याचा प्रयत्न केला. पण ती त्याला दाद न देता अखेर पश्चिम समुद्राला मिळाली.
अशा तऱ्हेने शंकराने जेथे जेथे सावित्रीला परतवण्याचा प्रयत्न केला तेथे तेथे स्वयंभू लिंगे निर्माण झाली आहेत. सावित्रीच्या काठी अशी बारा स्थाने आहेत. त्यातील शेवटचे श्रीहरिहरेश्वर हे कोकणातील एक तीर्थ समजले जाते. याच बारा स्वयंभू स्थानीन सावित्रीच्या काठी बारा ज्योतिलिंगे' असे म्हणतात. अशी माहिती सरोजिनी बाबर सम्पादित कुलदैवत या पुस्तकात पाहायला मिळते, महाबळेश्वरपासून प्रथम स्थान म्हणजे देवळे येथील शिवमंदिर होय. या मंदिराला शिलहारकाळापासून वारसा आहे.
शिवकाळातील किल्ले चंद्रगड येथे महाशिवरात्री निमित्त गडावर असणाऱ्या ढवळेश्वर मंदिरात ग्रामस्थांकडून अभिषेक केला जातो मोरसडे येथील आडाचा कॉड येथे काही वर्षांपूर्वी स्वयंभू शिवलिंग मिळाले. महादेवाचा मुरा येथे शिवमंदिर असून हे शिवमंदिर शिखर शिंगणापूर रायरेश्वर, या शृंखलेतील शेवटचा शिवमंदिर असल्याची माहिती महादेवाचा मुरा येथील पुजारी देतात तालुक्यात अनेक ठीकाणी शिवमंदिरे उभारले गेले आहेत.