पनवेलमध्ये उबाठाला ‌‘बळ‌’ pudhari photo
रायगड

Panvel municipal election results : पनवेलमध्ये उबाठाला ‌‘बळ‌’

1 लाख 25 हजार 992 मते मिळवत ठरला तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : विक्रम बाबर

पनवेलच्या राजकारणात अस्तित्व संपत आलेल्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंखात पुन्हा बळ भरल्याचे चित्र महापालिका निवडणुकीत दिसून आले. विधानसभा निवडणुकीत केवळ 43 हजार मते या पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती. या निवडणुकीत 1 लाख 25 हजार 992 पनवेलकरांची मते घेत हा पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीतनंतर नोटानंतर राजकीय विश्लेषकांकडून शिवसेनेच्या कामगिरीची जोरदार चचां आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 5 लाख 37 हजार 331 मते मिळवत एक नंबरचा पक्ष ठरला आहे तर एकेकाळी बाल्लेकिल्ला असलेल्या शेतकरी कामगार पक्ष 1 लाख 78 हजार 345 मते मिळवत दुसरा क्रमांकारव राहिला आहे. मात्र चार्चा आहे ती शिवसेना उबाठाच्या कामगिरीची. विधानसभा निवडणुकीत शेकाप आणि उबाठाचे उमेदवार वेगवेगळे लढले होते.

शेकापला सव्वालाखाच्या आसपास मते मिळाली होती, तर उबाठाच्या उमेदवाराला केवळ 43 हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. त्याच पनवेलमध्ये काही महिन्यांतच उबाठाने जवळपास तिप्पट मते मिळवली आहेत. पक्षातील फूट, कार्यकर्त्यांचे विखुरलेपण आणि संघटनात्मक मरगळ यामुळे अस्तित्व संपत चालेल्या उबाठाने पुन्हा उभारी घेतली आहे. जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली उबाठाने ही कामगिरी केली आहे.

कामोठेत तीन नगरसेवकांची बाजी

कामोठे शहर हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला ओळखला जात होता. 2017 च्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे 9 नगरसेवक निवडून आले होते, तर शेतकरी कामगार पक्षाचे 2 नगरसेवक विजयी झाले होते. मात्र, निवडणुकीनंतर काही कालावधीतच शेतकरी कामगार पक्षाचे हे दोन्ही नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपची पकड अधिक मजबूत झाली होती. त्यामुळे कामोठे हा भाजपचा अभेद्य गड मानला जात होता. मात्र या निवडणुकीत या गडाला तडे गेले आहेत.

कामोठे परिसरातील एकूण 11 जागांपैकी भाजपला केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपकडून प्रदीप भगत, हॅप्पी सिंग, दिलीप पाटील, कुसुम म्हात्रे, विकास घरत, रवींद्र जोशी, शीला भगत आणि हेमलता गोवारी हे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र उर्वरित तीन जागांवर उबाठाच्या उमेदवारांनी विजय मिळवत भाजपच्या एकहाती वर्चस्वाला जोरदार धक्का दिला आहे.

भाजपा 55

शेकाप 09

शिवसेना उबाठा 05

राष्ट्रवादी 02

काँग्रेस 04

शिवसेना 02

इतर 01

शेकापची पोकळी

या निकालांमुळे सर्वाधिक आव्हान निर्माण झाले आहे ते शेतकरी कामगार पक्षापुढे. अनेक दशकांपासून पनवेल परिसरात मजबूत पकड असलेल्या शेकापला यावेळी दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असले, तरी उबाठाची झपाट्याने वाढलेली मते भविष्यातील निवडणुकांसाठी इशाराच मानली जात आहे. परंपरागत शेकाप मतदारांचा एक भाग उबाठाकडे वळल्याची चर्चा असून, ही मतांतरणाची प्रक्रिया पुढील निवडणुकांत अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप विरुद्ध शेकाप अशी सरळ लढत दिसत होती, मात्र आता उबाठाच्या उदयानंतर ही लढत तिरंगी स्वरूप धारण करत आहे.

‌‘नोटा‌’ला 43 हजार 211 मते

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर गुरुवारी दुसरी निवडणूक पार पडत महापालिकेवर पुन्हा भाजप महायुतीची सत्ता आली आहे. मात्र शहरात दिवसभर चर्चा होती ती ‌‘नोटा‌’ची. 78 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तब्बल 245 उमेदवार रिंगणात होते. एकूण मतदारसंख्या 5 लाख 54 हजार 578 इतकी असताना केवळ 56 टक्के मतदान झाले. म्हणजेच 3 लाख 8 हजार 708 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदानात ‌‘नोटा‌’ला तब्बल 43 हजार 211 मते मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पनवेल महानगरपालिका निवडणुकीतील ‌‘नोटा‌’चे हे आकडे केवळ आकडेमोड नसून लोकशाहीतील जनभावनेचा आरसा आहेत. पुढील निवडणुकांमध्ये पक्षांनी आणि उमेदवारांनी गांभीर्याने पाहिले नाही, तर ‌‘नोटा‌’चा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

नोटांना मिळालेली मते

प्रभाग 1,2,3 : 5,215

प्रभाग 4,5,6, : 8,596

प्रभाग 7,8,9,10 : 8,808

प्रभाग 11,12, 13: 6,769

प्रभाग 14,15,16 :8,106

प्रभाग 17,18,19,20 : 5,717

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT