Raigad Local Body Polls
महाड : महाड नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकावून जसा करिष्मा साधला, तसाच करिष्मा येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून दाखवायचा आहे. शिवसैनिकांची आजची एकजूट पाहता या निवडणुकीत विजय निश्चित असून विरोधकांमध्ये आपल्याला हरवण्याची ताकद नाही, असे ठाम प्रतिपादन रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले.
महाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या १० जागांसाठी शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज भरण्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत ना. गोगावले बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची भव्य रॅली छ. शिवाजी महाराज चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आली.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमा गोगावले, उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष विजय सावंत, तालुका प्रमुख बंधु तरडे, युवासेना तालुका प्रमुख रोहिदास अंबावले, नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ना. गोगावले म्हणाले की, शिवसेनेविरोधात सर्व पक्ष एकत्र आले असले तरी शिवसैनिकांनी एकजूट दाखवून सर्वसामान्यांना सोबत घेतल्याने आपला विजय अटळ आहे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांचाही संघटनेत योग्य विचार केला जाईल. मतदारसंघात हजारो कोटींची विकासकामे केली असून जनतेने सांगितलेली प्रत्येक कामे प्रामाणिकपणे पूर्ण केली आहेत.
राज्याचा मंत्री म्हणून इतर मतदारसंघांचीही जबाबदारी असल्याने प्रत्येक शिवसैनिकाने आपणच भरतशेठ, विकासशेठ व सुषमा गोगावले असल्याच्या भावनेने या निवडणुकीत झोकून द्यावे. गोगावले कुटुंबाने मतदारसंघावर केलेल्या प्रेमाची परतफेड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून करावी, असे आवाहन त्यांनी केले.