राजेश डांगळे
खांदा कॉलनी: नोव्हेंबर महिन्याची चाहूल लागताच घाटमाथ्यावरील मेंढपाळ कुटुंबांनी आपल्या मेंढ्या आणि शेळ्यांच्या कळपांसह पनवेल तालुक्यात दाखल होण्यास सुरुवात केली आहे.
बदलत्या काळात शेतीच्या पद्धती आधुनिक होत असल्या, तरी शेती आणि पशुपालन यांच्यातील पारंपरिक नाते आजही टिकून आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकंती करणाऱ्या या मेंढपाळ कुटुंबांचा प्रवास अनेकांसाठी कुतूहलाचा, तर त्यांच्या जगण्याची कहाणी संवेदनशील करणारी आहे.
पनवेल तालुक्यात आजही अनेक शेतकरी भातशेतीसह विविध प्रकारची पिके घेतात. शेतीची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतजमिनीला नैसर्गिक खत मिळावे, यासाठी शेतकरी मेंढपाळांना आपल्या शेतात काही दिवस मुक्काम करण्याची परवानगी देतात.
मेंढपाळ आपल्या कुटुंबासह शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत तात्पुरता डेरा टाकतात. रात्रीच्या वेळी मेंढ्या आणि शेळ्या शेतात बसवल्या जातात. त्यांच्या विष्ठेमुळे जमिनीला नैसर्गिक खत मिळते. त्यामुळे जमिनीचा कस सुधारण्यास मदत होते.
या पारंपरिक व्यवस्थेत शेतकरी आणि मेंढपाळ दोघांचाही फायदा होतो. मेंढपाळांच्या कळपामुळे शेताला नैसर्गिक खत मिळते, तर त्याबदल्यात शेतकऱ्यांकडून मेंढपाळ कुटुंबांना धान्य किंवा ठरावीक पैसे दिले जातात. अशा प्रकारे अनेक वर्षांपासून शेती आणि पशुपालन यांचा एकमेकांना पूरक असा व्यवहार सुरू आहे.
कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी परिसरातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूनेही सध्या मेंढपाळांचे कळप मार्गक्रमण करताना दिसत आहेत.
एका बाजूला आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमुळे परिसराचा चेहरामोहरा बदलत आहे, तर दुसऱ्या बाजूला डोक्यावर संसाराचे ओझे आणि सोबत मेंढ्या-शेळ्यांचा कळप घेऊन निघालेली ही कुटुंबे आजही आपल्या पारंपरिक जीवनशैलीशी जोडलेली आहेत. विकासाच्या वेगवान प्रवासात दिसणारे हे चित्र अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या कळपातून चालताना मेंढ्यांच्या पिल्लांना भूक लागली की ती आपल्या आईच्या जवळ जातात. पिल्लाला दूध पाजण्यासाठी मेंढी काही क्षण थांबते. पुढे जाणाऱ्या कळपात आई आणि पिल्लामधील हे नाते पाहताना जणू मायेचा एक हळवा क्षणच रस्त्याच्या कडेला उभा राहतो.
पिढ्यान्पिढ्या चालत आलेला व्यवसाय
ऊन, वारा, पाऊस आणि लांबचा प्रवास यांची पर्वा न करता ही कुटुंबे आपल्या पशुधनासह गावोगावी फिरत असतात. मेंढ्या-शेळ्यांचे संगोपन, मुलांचे शिक्षण, रोजच्या संसाराचा खर्च आणि मुक्कामासाठी जागेचा शोध अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर असतात. तरीही पिढ्यान्पिढ्या चालत आलेला हा व्यवसाय ते जिद्दीने पुढे नेत आहेत.
पोटासाठी मैलोनमैल मेंढपाळांची पायपीट
आज रस्ते रुंदावले, विमानतळ उभे राहत आहे, शहरांचा विस्तार होत आहे; मात्र शेतजमिनीला नैसर्गिक खत देणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावणारी मेंढपाळांची ही परंपरा अजूनही जिवंत आहे.
आधुनिक विकासाच्या झगमगाटात दुर्लक्षित राहणाऱ्या या कष्टकरी कुटुंबांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. एका बाजूला विमानतळाच्या दिशेने धावणारा विकास आणि दुसऱ्या बाजूला पोटासाठी मैलोनमैल चालणारा मेंढपाळांचा कळप... पनवेलच्या बदलत्या परिसरात दिसणारे हे चित्र विकास आणि परंपरेची जणू एक वेगळीच कहाणी सांगत आहे.