पनवेल : विक्रम बाबर
रायगड जिल्हा आणि विशेषतः पनवेल तालुक्याच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाची (शेकाप) ओळख ही एकेकाळी बालेकिल्ल्याची होती. रायगडचा राजकीय उल्लेख झाला की शेकापचा लाल बावटा आणि ग्रामीण भागातील मजबूत संघटनात्मक पकड यांची चर्चा हमखास होत असे. मात्र 2026 च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर पनवेल तालुक्यातील शेकापचे अस्तित्वच धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
2017 पर्यंत पनवेल पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही स्तरांवर शेकापची एकहाती सत्ता होती. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकापचे वर्चस्व निर्विवाद मानले जात होते. शेकापच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेते घडले. पनवेल तालुक्याला माजी आमदार विवेक पाटील आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांसारखे प्रभावी नेतृत्व या पक्षाने दिले. या नेत्यांच्या बळावर शेकापने अनेक वर्षे तालुक्यात राजकीय पकड कायम ठेवली होती.
मात्र काळाच्या ओघात परिस्थिती बदलत गेली. माजी आमदार विवेक पाटील यांच्या अटकेनंतर पक्षाच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. त्यानंतर माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पक्षाची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र तालुक्यातील संघटनात्मक मोट बांधण्यात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, अशी राजकीय विश्लेषकांची भूमिका आहे.
पनवेल महानगरपालिका निवडणुकीतही शेकापला मोठा फटका बसला होता. 32 उमेदवार रिंगणात उतरवूनही पक्षाला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शेकापला एकही जागा जिंकता आली नाही. पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद, दोन्ही स्तरांवर पक्ष पूर्णपणे बाहेर फेकला गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागातील पारंपरिक मतदारसंघांमध्येही शेकाप उमेदवार पिछाडीवर राहिल्याने पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपसारख्या पक्षांनी ग्रामीण भागात संघटनात्मक विस्तार करत विकासाच्या मुद्द्यांवर जोर दिल्याने शेकापची पकड सैल झाली.
पनवेल तालुक्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे येणाऱ्या काळात शेकापला संघटनात्मक पुनर्बांधणी करावी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. अन्यथा रायगड जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असलेला शेतकरी कामगार पक्ष पनवेल तालुक्यातून पूर्णपणे हद्दपार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर, महाडमध्ये मंत्री भरत गोगावले, अलिबागमध्ये आमदार महेंद्र दळवी, पेणमध्ये आमदार रविंद्र पाटील, श्रीवर्धनमध्ये मंत्री आदिती तटकरे यांनी आपले गट राखले असताना कर्जतमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि उरणमध्ये आमदार महेश बालदी यांना मात्र नगरपालिकेनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत धक्के बसले आहेत. कर्जतची नगरपालिका राष्ट्रवादी शिवसेनेने जिंकली होती. त्या पाठोपाठ आता जिल्हा परिषद निवडणुकीत कर्जतमध्ये एकही जागा जिंकता आली नाही. तिच स्थिती उरणमध्ये महेश बालदी यांची झाली आहे. दोन्ही पंचायत समितीही आमदारांच्या हातून निसटल्या आहेत.