Raj Thackeray (file photo)
रायगड

Raj Thackeray | 'महाराष्ट्राला नख लागत असेल तर अंगावर येऊ'; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

पनवेलमध्ये शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरे- संजय राऊत एका मंचावर

दीपक दि. भांदिगरे

Shekap Melava Raj Thackeray

पनवेल : देशाचे पीएम आणि गृहमंत्री ज्या राज्याचे आहेत; त्या राज्याची शेतजमीन कोणीही विकत घेऊ शकत नाही. प्रत्येकजण आपल्या राज्याचा विचार करत असतो. आपण आपल्या राज्याचा विचार का करु नये? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी (दि. २ ऑगस्ट) केला. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य संमेलन भरवत आहे. गुजराती बद्दलचे प्रेम नाही आहे, हे मराठी माणसे आणि गुजरातीचे भांडण लागावं म्हणून सुरू आहे. तुम्हाला हवं ते आम्ही करणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करु. तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागत असेल तर अंगावर येऊ, असा इशारा राज यांनी दिला. पनवेलमधील शेतकरी कामगार पक्षाच्या (Shekap Melava) ७८ व्या वर्धापन दिन मेळाव्यात ते बोलत होते.

एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची जमीन गेली की तुम्हाला कसलेही स्थान नाही. रायगडमध्ये कोण येत आहे? कोण राहत आहे? माहीत नाही. ठाण्यात कोण येत आहे? कोण राहत आहे? माहीत नाही. आमचेच लोक जमिनी विकत आहेत. माझी विनंती आहे की यापुढे जमिनीसाठी लोक आले तर जमीन विकू नका. मराठी माणसाचा मान- सन्मान राखून उद्योग आणावे लागतील. त्यांना म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तर आम्ही तुमच्या कंपनीत पार्टनर म्हणून येऊ. येथील विमानतळावर सर्वाधिक १०० टक्के मराठी मुले कामाला लागली पाहिजेत. अन्यथा रायगडमध्ये अमराठी नगरसेवक, आमदार म्हणून निवडून येतील, असे राज ठाकरे म्हणाले.

अटक करुन दाखवाच, राज यांचे सरकारला आव्हान

कोणत्याही प्रकल्पाला विरोध केला तर अटक केली जाईल, असे सांगितले जाते. एकदा अटक करून दाखवाच, असा शब्दांत राज ठाकरे यांनी राज्य सरकारला आव्हान दिले आहे.

'महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका'

या देशाचे पीएम आणि गृहमंत्री हे दोन्ही गुजरातचे आहेत. अमित शाह म्हणतात की, मी हिंदी भाषिक नाही, गुजराती आहे. मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेले. प्रत्येक नेत्याला आपल्या राज्याचे प्रेम असते. पण आपल्या नेत्यांचे विचार संकुचित आहेत. देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची दशा होऊ नये, याची काळजी घ्यावी लागले. यामुळे आपल्या आजूबाजूला काय चाललंय ते पाहा. सतर्क राहा. महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी मराठी माणसांना केले.

महाराजांच्या राजधानीत सर्वाधिक डान्स बार कसे?

सर्वाधिक डान्स बार रायगड जिल्हामध्ये आहेत आणि तेही महाराजांच्या राजधानीत कसे? असा उद्विग्न सवालही त्यांनी केला. रायगडचा मुद्दा पक्षाचा विचार न करता समजून घ्या. तुम्हाला भरकटवून टाकले जात आहे. भलतेच विषय आणले जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पैसे देऊन मत घेण्याचे उद्योग सुरू आहेत. फारसी शब्द असू नये, असा महाराष्ट्र आहे. तिथे आपण सगळे घालवत आहोत. जेव्हा आपण सगळे घालवतो, तेव्हा फक्त प्रेत उरते. तुम्ही जिवंत असले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

राज ठाकरे- संजय राऊत एका मंचावर

शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गट एकत्र पाहायला मिळाला. या मेळाव्याच्या मंचावर राज ठाकरे यांच्यासह शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT