जयंत धुळप
रायगड: जिद्द, अचाट धाडस आणि शिवकालीन इतिहासाविषयीची जाज्वल्य निष्ठा उराशी बाळगून सह्याद्रीचे कडेकपाटी पादाक्रांत करणाऱ्या अलिबाग जवळच्या लोणारे-भूते गावातील अवघ्या आठ वर्षांच्या शर्विका अमृता जितेन म्हात्रे हिने एक नवा सुवर्णइतिहास रचला आहे.
महाराष्ट्राची छोटी हिरकणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शर्विकाने नुकताच आपल्या दुर्गभ्रमंतीतील अत्यंत खडतर समजला जाणारा 200 वा दुर्ग सर करून एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि ऐतिहासिक महत्त्वाचा असलेला रांगणा किल्ला हा शर्विकाच्या या अद्भूत प्रवासातील 200 वा किल्ला ठरला आहे.
कधीकाळी वयाच्या अवघ्या अडीच वर्षांची असताना पहिला किल्ला रांगत रांगत चढणारी सह्याद्रीची ही लाडकी लेक, आज प्रत्यक्ष रांगणा गडावर भगवा फडकवून आली आहे. तिच्या या अचाट कामगिरीने संपूर्ण महाराष्ट्राचे मान-सन्मान आकाशासारखे उंच केले असून, तिचे हे यश शब्दांच्या पलीकडचे म्हणजेच निःशब्द करणारे आहे.
शर्विकाचा हा 200 वा दुर्ग प्रवास केवळ एक मोहीम नव्हती, तर ती एक भक्ती होती. या मोहिमेवर निघण्यापूर्वी शर्विकाने कोल्हापूरच्या ऐतिहासिक जुन्या राजवाड्यात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या तख्ताचे मनोभावे दर्शन घेतले. शिवरायांच्या दैनंदिन पूजेतील देवी-देवतांचे आशीर्वाद घेतले.
त्यानंतर कोल्हापूर राजघराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती आणि संयोगिताराजे छत्रपती यांची भेट घेऊन त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. रांगणा गडाच्या चढाईपूर्वी तिने शिवरायांचे गुरु मौनीबाबा यांच्या समाधीचे आणि भद्रकाली मातेच्या प्राचीन मंदिराचे दर्शन घेऊन घनदाट जंगलातून आपली चढाई सुरू केली. दोनशेव्या किल्ल्यासाठी रांगणा गडच का निवडला? या प्रश्नावर आठ वर्षांच्या शर्विकाने दिलेले उत्तर तिच्यातील प्रगल्भ इतिहास अभ्यासाची साक्ष देणारेच ठरले आहे.
शर्विका म्हणाली, छत्रपती संभाजी महाराज जेव्हा आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत होते, तेव्हा अत्यंत कठीण परिस्थितीत राजमाता जिजाऊसाहेबांनी हा गड जिंकून स्वराज्याला मोठा आधार दिला होता. तसेच, पुढे महाराणी ताराराणी यांनीही काही काळ या गडाला आपली राजधानी बनवले होते. अशा थोर रणरागिणींच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक गडावर जाऊनच मला 200 वा टप्पा पूर्ण करायचा होता, असे तीने सांगीतले.
शर्विकाच्या या धाडसाची दखल घेऊन तिला आजवर सामाजिक, पत्रकारिता, राजकीय, आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील 150 हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अडीच वर्ष वयापासून सुरू झाला प्रवास शर्विकाने वयाच्या अवघ्या अडीच वर्षांपासून आईअमृता आणि वडिल जितेन यांच्या सोबतीने सह्याद्रीच्या कुशीत पाऊल ठेवले.
रांगायला शिकण्याच्या वयात तिने गड-किल्ल्यांची चढाई सुरू केली आणि केवळ सहा वर्षांच्या प्रत्यक्ष भटकंतीत तब्बल 200 दुर्ग सर करण्याचा थक्क करणारा टप्पा पार केला. यापूर्वी तिने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई, सर्वात उंच समजला जाणारा साल्हेर किल्ला, तसेच गुजरातमधील अतिशय दुर्गम व उंच असे गिरनार शिखरही लीलया सर केले आहे.