Shahapur Sub District Hospital pudhari photo
रायगड

Shahapur Sub District Hospital : शहापूर रुग्णालयातील सिटीस्कॅन ४ महिन्यांपासून बंद

खासगी रुग्णालयांत ५ ते ६ हजारांचा खर्च; गरीब रुग्णांनी पैसे आणायचे कुठून ?

पुढारी वृत्तसेवा

शहापूर : राजेश जागरे

कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड या खाजगी एजन्सीचे बिल थकीत असल्याने शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन संबंधित एजन्सीने चार महिन्यांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना सिटीस्कॅन तपासणीसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून खासगी रुग्णालयांमध्ये एका सिटीस्कॅन तपासणीसाठी पाच ते सहा हजार रुपये खर्च येत असल्याने सामान्य रुग्णांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

आधीच औषधोपचारांचा खर्च करतांना कुटुंबांची दमछाक होत असून केवळ निदान तपासणीसाठी एवढी मोठी रक्कम आणायची कुठून असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.

सिटीस्कॅन तपासणी ही अपघातग्रस्त, मेंदूविकार, गंभीर दुखापत तसेच विविध आजारांचे अचूक निदान करण्यासाठी महत्वाची वैद्यकीय सुविधा आहे. अनेकदा रुग्णांच्या पुढील उपचारांची दिशा ठरवण्यासाठी ही तपासणी तातडीने करणे आवश्यक असते. मात्र मशीन बंद असल्याने रुग्णांना बाहेर तपासणीसाठी जावे लागत आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

विशेष म्हणजे, रुग्णालय प्रशासनाकडून वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार झाल्याची माहिती समोर आली असली तरी प्रत्यक्षात सिटीस्कॅन सेवा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा यापलीकडे जाऊन मशीन दुरुस्ती अथवा पर्यायी व्यवस्था करण्यासाठी ठोस निर्णय कधी होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.

शहापूरसारख्या ग्रामीण व आदिवासीबहुल तालुक्यातील नागरिकांसाठी उपजिल्हा रुग्णालय हे आरोग्यसेवेचे महत्वाचे केंद्र आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून सिटीस्कॅन सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी रुग्ण समितीचे सदस्य हेमंत मोरे यांनीही शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनाकडे केली.

उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन ३० जुलै २०२६ पासून बंद आहे. कृष्णा एजन्सीचे बिल थकीत असल्याने संबंधित एजन्सीने सिटीस्कॅन सेवा बंद केली आहे. ही सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच उपसंचालक स्तरावर पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू आहे.
डॉ. गजेंद्रसिंह पवार, वैद्यकीय अधिक्षक (उपजिल्हा रुग्णालय, शहापूर)
शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. ही बाब सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्यंत चिंताजनक आहे. खासगी रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅनसाठी ६ हजार रुपये खर्च येत असल्याने रुग्णांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या प्रश्नाकडे केवळ तांत्रिक बिघाड म्हणून न पाहता मानवी आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहावे.
सुभाष धामणे, उपविभाग प्रमुख, शिवसेना,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT