Shahapada Dam Pudhari
रायगड

Shahapada Dam: बावीस वर्षांपासून शहापाडा धरण रुतलेय गाळात

धरणाची साठवण क्षमता 30 टक्क्याने घटली; अखेर गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात; पेणकरांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

प्रकाश माळी

वढाव: पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरासाठी जीवनदायी ठरलेल्या शहापाडा धरणाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अखेर प्रशासन व जिल्हा परिषदेच्या प्रयत्नाने मार्गी लागण्याच्या दिशेने पुढे सरकताना दिसत आहे. तब्बल 22 वर्षांहून अधिककाळ शहापाडा धरणातील काढलेला नसून धऱणाची साठवण क्षमता सुमारे 30 टक्क्यांनी कमी झाली आहे.

हा साठलेला गाळ बाहेर टाकण्याचा धरणाच्या खालचा दरवाजा 11 एप्रिल रोजी तांत्रिक दुरुस्ती करून पुन्हा सुरू करण्यात आला. ही केवळ यांत्रिक दुरुस्ती नसून, खारेपाटातील पाणी प्रश्न सोडवण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

शहापाडा धरणाची मूळ साठवण क्षमता सुमारे 0.92 दशलक्ष घनमीटर इतकी होती, मात्र दीर्घकाळ गाळ न काढल्यामुळे ही क्षमता सध्याच्या घडीला सुमारे 0.64 दशलक्ष घनमीटरपर्यंत घसरली आहे. म्हणजेच सुमारे 0.28 दशलक्ष घनमीटर, अंदाजे 280 कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली होती.

ही केवळ आकडेवारी नसून खारेपाटातील जनतेच्या पाणीटंचाईशी थेट निगडित बाब आहे. पाणी उपलब्ध असूनही साठवण क्षमता कमी असल्यामुळे ते टिकत नाही, हीच आजची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर गाळ व्यवस्थापनाचा अभाव आणि धरणाच्या देखभालीकडे झालेले दुर्लक्ष हेच या समस्येचे मूळ कारण असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे दरवाजा सुरू होणे म्हणजे केवळ तांत्रिक दुरुस्ती नव्हे, तर पाणी व्यवस्थापनात आवश्यक असा बदल असल्याचे मानले जात आहे.

दरवर्षी टंचाईग्रस्त गावांसाठी कोट्यवधी रुपयांचा कृती आराखडा शासनाने मंजूर केला जातो. तालुक्यातील 39 गावे व 103 वाड्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी शासनान निधी मंजूर करत असला तरी निधी पुरेसा नसल्याने खारेपाटात पाणीटंचाईच्या झळाही वाढू लागल्या आहेत. गेली कित्येक वर्षापासून तालुक्यातील शिर्की वाशी खारेपाटातील टंचाईग्रस्त गावांवर व वाड्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी शासकीय व खासगी टँकरचा आधार घेतला जातो. खर म्हणजे धरण उशाशी असून गेले कित्येक वर्षे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकर आधार घेतला जातो हे म्हणजे एक येथील जनतेचे दुर्दैव ठरले आहे.

शासकीय टँकर कमी होत चालल्याने खारेपाटात पाणीपुरवठा करण्यासाठी टंॅकरचीही टंचाई निर्माण होऊ लागली आहे. यावर्षी गेल्या महिनाभरापासून खारेपाटातील 8 ग्रा. पं. मधील 27 वाड्यांवर टँकरची मागणी होत असतानाही खारेपाटात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.

शहापाडा धरणातील गाळ काढण्यासाठी रोज 4 डंपर, 4 टॅक्टर, जेसीबी लावलेआहेत यासाठी दिवसाला 30 हजारपर्यंत खर्च येत आहे. सर्व गाळ काढण्यासाठी कमीत कमी 50 ते 70 लाखा प्रयत्न खर्च येणार आहे. गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून चार फूट खोदण्यात येत आहे परंतु 3 ते 3 फुटापर्यंत पाणी लागत असल्याने खोदकाम करण्यासाठी अडचण येत आहे.

कितेक वर्ष प्रलंबित असलेला शहापाडा धरणातील गाळ काढण्यात मी प्रयत्न करीत आहे. सध्या या कामासाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या आपण स्वत: या कामासाठी खर्च करीत आहे. पाऊस सुरू होण्याआगोदर शक्य होईल, तेवढा धरणातील गाळ काढण्याचा प्रयत्न करणार आहे. या कामावर आपण लक्ष ठेवून आहोत.
- प्रभाकर म्हात्रे, सदस्य, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT