Sawantwadi Gaur Sightings Pudhari
रायगड

Sawantwadi Gaur Sightings: सावंतवाडीत पहाटे शहरात रानगव्यांचा कळप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरोडा नाका परिसरात साडेतीन तास गव्यांचा मुक्त वावर, वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी शहराच्या मुख्य वस्तीत मंगळवारी भल्या पहाटे रानगव्यांच्या कळपाचे दर्शन नागरिकांना झाले. भर शहरात वावरणारे गवे पाहून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील शिरोडा नाका येथील वृंदावन सोसायटी परिसरात पहाटे 3.30 वा ते स. 6 वा. असे सुमारे साडेतीतास पाच गव्यांचा हा कळप मुक्तपणे वावरत होता. शहराच्या मध्यवस्तीत गव्यांचा शिरकाव होण्याची ही घटना धोकादाय व गंभीर असून वनविभागाने याची वेळीच दखल घेण्याची मागणी होत आहे.

शहरा लगतच्या नरेंद्र डोंगर परिसरातून आलेल्या या गव्यांनी मंगळवारी भल्या पहाटे शहरातील शिरोडा नाका परिसरात प्रवेश केला. गव्यांच्या हंबरण्याने काही नागरिकांना जाग आली. येथील वृंदावन सोसायटीतील काही नागरिकांनी खोलीच्या बाहेर येऊन पाहिले असता चक्क गव्यांचा कळप वावरत असल्याचे पाहून त्यांची पाचावर धारण बसली.

पहाटे सहा वाजेपर्यंत हा कळप परिसरातच वावरत होता. त्यानंतर झुंजूमुंजू होताच हा कळप पुन्हा नरेंद्र डोंगराच्या दिशेने निघून गेला. दरम्यान पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही या गव्यांचे दर्शन झाले. थेट परिसरात रस्त्यालगत वावरणारे गवे पाहून त्यांची पाचावर धारण बसली. या नागरिकांनी प्रसंगावधान राखत मॉर्निंग वॉक करणाऱ्या अन्य नागरिकांना याबाबत सावध केल्याने अनेक नागरिकांनी खबरदारी म्हणून मॉर्निंग वॉकला जाणे टाळले. सुदैवाने, या काळात गव्यांनी कोणावरही हल्ला केला नाही किंवा मालमत्तेचे नुकसान केले नाही.

गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील ग्रामीण भागात गव्यांचा वावर वाढला आहे, मात्र हे गवे आता थेट शहरात मुख्य वस्तीत पोहोचल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळी हा कळप पुन्हा आपल्या नैसर्गिक अधिवासात निघून गेला असला, तरी रहिवाशांमध्ये भीती कायम आहे.

शहरात गव्यांचा शिरकाव रोखण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि या परिसरात गस्त वाढवून गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT