

रोहे : महादेव सरसंबे
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या रोहा तालुक्यात शिंदेचे शिवसेनेने तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे यावेळी रोहा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत रंगत वाढले असून प्रचाराला वेग आला आहे. कॉर्नर सभा, गाव भेटी, प्रचार रॅली गावागावात चालू आहेत.
रोहा तालुक्यातील नागोठणे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी (अजित पवार गट) किशोर जैन विरुद्ध ( शिवसेना शिंदे गट) सुमित काते या दोन उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहावयास मिळणार आहे. या गटात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ दिगंबर धुळे हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाचे ताकद वाढले असले तरी लोकमत कोणाच्या बाजूने जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आंबेवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी (अजित पवार गट )कडून निधी नरेंद्र जाधव विरोधात शिवसेना ( शिंदे गट ) च्या सीमा समिर महाबळे लढत असूनही ही लढत तुल्यबळ होणार असल्याची बोलले जात आहे. आंबेवाडी जिल्हा परिषद गट हा पारंपारिक राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे परंतु यावेळी शिवसेना ( शिंदे गट )नी या मतदारसंघात जोर लावल्याचे दिसून येते. या मतदारसंघात थेट लढत आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे दिग्गज नेते वास्तव असलेला भुवनेश्वर जिल्हा परिषद गट ओळखला जातो. या गटात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. हा जिल्हा परिषद मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी ( अजित पवार गट )कडून मधुकर मारुती पाटील, ( शिवसेना शिंदे गट ) कडून शिवसेना उपतालुकाप्रमुख संदेश मोरे, शिवसेना (उबाठा) कडून शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन दत्तात्रेय वारंगे व अपक्ष दिप चंद्रकांत वायडेकर हे निवडणूक लढवत आहेत.
नागठणे, आंबेवाडी व भुवनेश्वर या जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादी व भाजप एकत्रित लढत आहेत. परंतु रोहा तालुक्यातील घोसाळे जिल्हा परिषद गटात भाजपाचे उमेदवार म्हणून सुश्रुता सुभाष पाटील या निवडणूक लढवत असल्याने या मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी युती नसल्याचे दिसून येते. या मतदारसंघात शिवसेना (उबाठा) कडून संचिता सचिन फुलारे, शिवसेना (शिंदे गट) कडुन उर्वशी उदेश वाडकर, राष्ट्रवादी (अजित पवार गट) रोहीणी रामचंद्र सकपाळ, शेतकरी कामगार पक्षाकडून वैष्णवी हेमंत ठाकुर या निवडणुक लढत आहेत. या मतदारसंघात पंचरंगी लढत असल्याचे दिसून येते त्यामुळे या मतदारसंघात उमेदवार हा कमी फरकाने विजय होईल असे बोलले जाते.
रोहा तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या तालुक्यात खा. सुनील तटकरे, ना. आदिती तटकरे व माजी आ. अनिकेत तटकरे जातीने लक्ष घालत असते. तर दुसरीकडे शिवसेना ( शिंदे गट )चे ही या मतदारसंघाकडे जातीने लक्ष आहे. ना. भरतशेठ गोगावले व आमदार महेंद्र दळवी यांच्याही या मतदारसंघाकडे लक्ष आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना तगडे आव्हान दिल्याचे दिसून येते. घोसाळे जिल्हा परिषद मतदार संघात माजी आमदार पंडितशेठ पाटील ठिय्या मांडूनच आहेत. भाजप सुद्धा ही जागा विजय करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.