अलिबाग : अलिबाग तालुक्यातील सासवणे गावातील मोक्याची सरकारी जागा एका उद्योगपतीला देण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. एका उद्योजकाने सासवणे गावातील समुद्र किनाऱ्यावरील 20 गुंठे सरकारी जागा फळझाडे लावण्यासाठी मिळावी अशी मागणी शासनाच्या महसूल व वन विभागाकडे केली.
यांनतर सासवणे ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून प्रशासकीय स्तरावर संबंधित उद्योजकाला सदर जागा देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. याची कुणकुण ग्रामस्थांना लागताच गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायता तसेच ग्रामस्थांनी सदर जागा उद्योजकाला देण्यास जिल्हाधिकारी यांना निवेदन देत हरकत घेतली आहे. तसेच सदर जागेचा वापर हा ओपन जिम किंवा गार्डन म्हणून करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अलिबाग तालुक्यातील सासवणे गावात एका उद्योगपतींची जागा आहे. या जागेला लागून सरकारी पड जागा आहे. यामधील 20 गुंठे जागा फळझाडे लावण्यासाठी मिळावी अशी मागणी शासनाकडे या उद्योजकाने केली. त्यांनी मागणी केल्यानंतर त्यांना जमीन कवडीमोल किमतीने देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पायघड्या टाकल्या. वन विभाग, कृषी विभाग, महासून विभाग यासह विविध विभागणी जागेचे पंचनामे करून आपले अभिप्राय शासनाकडे सादर केले. हे सर्व करताना सासवणे ग्रामपंचायतीला पूर्णपणे अंधारात ठेवले.
सासवणे येथील संबंधित उद्योजकाला देण्यात येणार असल्याची हालचाल सुरू असल्याची माहिती गावात पसरताच गुरुवारी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाले. यांनतर सरपंच, ग्रामस्थ यांनी गट क्रमांक 23 येथे जात जागेची पाहणी केली. तसेच सदर जागा ही शासनाने दुभाष यांना दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा मनोदय व्यक्त केला.
गट क्रमांक 23 मधील 20.10 गुंठे जागा उद्योजकाला देण्यास सासवणे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थानी विरोध दर्शविला आहे. या जागेत ओपन जिम, गार्डन तसेच वृक्ष लागवड करण्याचा मानस ग्रामपंचायतीन व्यक्त करीत ही जागा ग्रामपंचायतीला मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच सासवणे मांडवा विभाग सहकारी मच्छीमार व्यावसायिक संस्था मर्यादित यांनीही जिल्हाधिकारी यांच्यासोबत पत्रव्यवहार करीत सफर जागा दुभाष यांना देण्यास हरकत घेतली आहे.
सासवणे समुद्रकिनाऱ्यावरील जागा एका उद्योजकाला देण्यास शासन प्रयत्नशील आहे. ही जागा शासकीय असून येथे ओपन जिम व वृक्षलागवड करण्यासाठी ग्रामपंचायतीला मिळावी यासाठी यापूर्वीच ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव घेतला असून, प्रशासनासोबत पत्रव्यवहार सुरू आहे. ही जागा कोट्यवधी रुपयांची असून ती कवडीमोल दराने हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे, ते थांबविले पाहिजे.संतोष गावंड, सरपंच, सासवणे ग्रामपंचायत
अलिबाग पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. सासवणे गाव समुद्रकिनारी असल्याने येथे मोठमोठे उद्योजक यांचे बंगले आहेत. यातील एका उद्योजकाने गावातील समुद्रकिनाऱ्याची जागा शासनाकडे आपणास मिळावी अशी मागणी केली आहे. हे प्रकरण धक्कादायक आहे. ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी न घेता वरिष्ठ पातळीवर उद्योजकाला जमीन देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही जागा ग्रामपंचायतला मिळावी जेणेकरून ग्रामस्थांच्या रोजगारासाठी ग्रामपंचायतीला जागेचा विकास करता येईल.स्नेहल देवलेकर, महिला आघाडी तालुका संघटिका, शिवसेना (ठाकरे)
गावातील जागा एखाद्या उद्योजकाला देणे चुकीचे आहे. ही जागा गावातील जनतेच्या वापरासाठी आली पाहिजे. पर्यटक येतात त्या दृष्टीने या जागेचा विकास करण्यात यावा. शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून, सरळ जागा उद्योजकाला बहाल करू नये.नैना शिलधनकर, सदस्या, सासवणे ग्रामपंचायत