सुधीर नाझरे
मुरुड जंजिरा: सामराजगड हा किल्ला मुरुडच्या दक्षिण दिशेस असलेल्या एकदरा गावात असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ८० मीटर आहे. हा शिवकालीन दुर्ग सामराजगड संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे.
मुरुड येथून खाडीवरील पूल ओलांडून आपण रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या एकदरा गावात शिरल्यावर तेथून गावाच्या मागे असलेल्या सामराजगड कालीन इतिहासाचा अविभाज्य भाग असून शिवरायांनी जंजिरा किल्ल्याच्या स्वारीवेळी टेहळणी गड म्हणून बांधलं होतो परंतु आज त्या गडाचा वापर खडक दर्शक दिवा म्हणून होतोय.
गडाचे सर्व बुरुज नष्ट झालेत परंन्तु ह्या गडावरून जंजिरा किल्ला व पद्मदुर्ग किल्ला अगदी जवळ दिसतो. स्वारी काळात लक्ष ठवण्यासाठी या गडाचा वापर होत असे. गडाच्या संवर्धनाची गरज आहे.
आज देखील बुरुजाचे बांधकाम करून शिवरायांचा पुतळा करण्यात आला तर तो परिसर सुंदर होईल. पर्यटकांना जलदुर्गासोबत हा गड पाहण्याचा आनंद घेता येईल. या गडावरून विशाल समुद्राचे दर्शन होते. त्याबरोबर पूर्ण मुरुड दर्शन होते पर्यटकांचा आवडता पॉईंट होऊ शकतो.
मुरुड तालुक्यातील सामराजगड हा एक ऐतिहासिक मात्र अपरिचित दुर्ग. मुरुड जंजिरा येथे आल्यावर पर्यटक जंजिरा व पद्मदुर्ग या जलदुर्गांना आवर्जून भेट देतात मात्र काही जणांचीच पावले सामराजगडाकडे वळतात.
याचे महत्वाचे कारण म्हणजे या गडाविषयी अनेकांना फारशी माहिती नाही. मात्र गेल्या काही वर्षांत दुर्गप्रेमींच्या जागरूकतेमुळे या अपरिचित किल्ल्याकडे पर्यटकांची पावले वळायला लागली आहेत.
गडाच्या पायथ्याशी एक शिवमंदिर असून रस्त्यात एकदरा गावातील घरे दुतर्फा दिसून येतात. काही वेळाने मनुष्यवस्ती संपून टेकडीच्या माथ्यावर आपण येऊन पोहोचतो. पुढे पोहोचल्यावर गडाचे उध्वस्त प्रवेशद्वार व बुरुज नजरेस पडतात. गडावर तटबंदी व बुरुजांचे अवशेष आजही दिसून येतात मात्र काळाच्या ओघात त्यांचे अस्तित्व नष्ट होऊ लागले आहे.
सामराजगडाचे महत्व हे त्याच्या उंचीमुळे नसून त्याचे स्थान आणि मराठ्यांचा प्रबळ शत्रू सिद्दी याची राजधानी असलेल्या जंजिरा या किल्ल्यावर वचक ठेवणे आणि राजपुरी खाडीवरील दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी होते. किल्ल्यावरून जंजिरा, पद्मदुर्ग, मुरुड शहर, राजपुरी खाडी व अरबी समुद्र असा विस्तृत परिसर दृष्टिक्षेपात ठेवणे हा आहे.
सामराज गडाच्या निर्मितीचा इतिहास फारसा उपलब्ध नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वाकांक्षी जंजिरा मोहिमांमध्ये हा किल्ला बांधण्यात आला असावा. अनेकांच्या मते सामराजगडाचे बांधकाम हे १६६१ साली जेव्हा शिवाजी महाराजांनी व्यंकोजीपंत यांना ५००० स्वार आणि २००० मावळे देऊन राजपुरीवर पाठवले होते तेव्हा झाले असे मानतात.
मात्र या मोहिमेपूर्वी सुद्धा शिवाजी महाराजांनी जंजिऱ्यावर अदमासे १६५९ साली एक मोहीम काढली होती व तिचे नेतृत्व त्यांनी शामराज निळकंठ या पेशव्यांकडे दिले होते.
सामराज गडाचा इतिहास याच कालावधीतील असावा कारण शामराज पंत हे तत्कालीन पेशवे या मोहिमेवर असताना हा किल्ला बांधण्यात आला असावा व त्यामुळे गडास सामराज गड म्हणून ओळख मिळाली असावी. साम्राज्य गड या अर्थानेही सामराज गड असा किल्ल्याच्या नावामागील आणखी एक निष्कर्ष काढता येतो.
शिवाजी महाराजांनी त्याच वर्षी निळोपंत मुजुमदार, दर्या सारंग, दौलतखान आणि मायनाक भंडारी उर्फ मायाजी भाटकर यांना जंजिऱ्यास धाडले व ही मोहीम बऱ्यापैकी यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर १६६१ सालच्या पावसाळ्यात शिवाजी महाराजांनी व्यंकोजीपंतांबरोबर ५००० स्वार आणि २००० पायदळ देऊन त्यांना जंजिरा मोहिमेवर पाठवले.
यावेळी मराठ्यांनी सिद्दीचे मुख्य स्थान राजपुरी सुद्धा जिंकून तेथे तळ दिला. याच कालावधीत शिवाजी महाराजांनी कांसा उर्फ पद्मदुर्ग हा किल्ला बांधून. राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी वसवली.. यानंतर मराठयांच्या राजपुरी खाडीवरील आरमाराचे केंद्र पद्मदुर्ग उर्फ कांसा हा किल्ला बनला. या मोहिमेतही सामराजगडाचे अमूल्य योगदान मराठ्यांना लाभले असावे.
सामराजगडावरून संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्यावर तोफगोळ्यांचा वर्षाव सुरु केला व हा वर्षाव सलग ३० दिवस सुरु होता. या हल्ल्यामुळे जंजिरा किल्ल्याचा समोरील तट कोसळला आणि सिद्दींची पाचावर धारण बसून त्यांनी जंजिरा किल्ल्याच्या आजूबाजूला असणाऱ्या टेकड्यांवर आश्रय घेतला. असा इतिहास असलेला हा सामराज गड संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे.