अलिबाग : रायगड जिल्ह्यातील 402 सार्वजनिक आणि 526 खासगी, अशा एकूण 928 साखरचौथ गणपतीच्या मूर्तींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या तालावर निघालेल्या मिरवणुका हे अलिबाग शहरातील विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य आहे.
भक्तांच्या घरात गणेशोत्सवाच्या दिवशी गणरायाची मूर्ती पोहोचत नाही, तोपर्यंत मूर्तिकार कामामध्ये अडकलेले असतात. त्यामुळे त्यांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही. त्यांनाही गणरायाची भक्तिमय सेवा करता यावी. त्यांनाही हा उत्सव साजरा करता यावा, यासाठी गणेश चतुर्थीनंतर येणार्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला साखरचौथ गणपती उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे.
बुधवारी वाजत-गाजत दीड दिवसांच्या गणरायाचे आगमन झाले होते. सकाळपासूनच विविध कार्यक्रमाची रेलचेल विविध मंडळांमध्ये दिसून आली. गुरुवारी बाप्पाला निरोप देण्यात आला. अलिबाग शहरातील ठिकरुळ नाका, श्रीबाग, चेंढरे यासह अन्य मंडळांनी बाप्पाच्या निरोपाची जय्यत तयारी केली होती.
जिल्ह्यामध्ये खासगी गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन सायंकाळी 5.30 वाजता सुरू झाले होते, तर सार्वजनिक मंडळांनी सायंकाळी 7 वाजल्यापासून बाप्पाच्या मिरवणुका काढल्या होत्या. तलाव, समुद्र अशा ठिकाणी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.