रायगड: जयंत धुळप छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये उंबरखिंडीच्या नैसर्गिक भौगोलिक रचनेचा वापर करून गनिमी काव्याने शत्रूला नमवले, तर तब्बल ३६५ वर्षांनंतर आज त्याच सह्याद्रीच्या कठीण पाषाणाला आधुनिक विज्ञानाने छेद देत मिसिंग लिंकच्या रूपाने विकासाचा महामार्ग उभारला आहे. हा एक विलक्षण असा रणनीतीच्या संघर्षाकडून ते अभियांत्रिकीच्या चमत्काराकडे झालेला न भूतो न भविष्यती अशा प्रवास आहे.
सह्याद्रीचा दुर्गम आणि राकट भाग नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. १६६१ मध्ये याच मातीतून स्वराज्य रक्षणाचा मार्ग जात होता आणि २०२६ मध्ये याच मातीतून प्रगत भारताच्या दळणवळणाचा मार्ग जात आहे. उंबरखिंडीची लढाई आणि मिसिंग लिंक प्रकल्प या दोन्हीं घटनांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे अशक्य वाटणाऱ्या भौगोलिक परिस्थितीवर मिळवलेला विजय.
रणनीती आणि अभियांत्रिकी:
दोन युगांतील दृष्टिकोन सन १६६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे तोफखाना किंवा अफाट सैन्य नव्हते, पण त्यांच्याकडे भूगोल हे सर्वात मोठे शस्त्र होते. रायगड जिल्ह्यातील खालापूर आणि पुणे जिल्ह्यातील लोणावळा या दरम्यानच्या उंबरखिंडीच्या अरुंद वाटेचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सेनापती कारतलब खान यांच्या ३० हजार मुघल सैन्याला एका नैसर्गिक जाळ्यात अडकवले आणि त्यांचा पराभव करुन स्वराज्याचे आणि स्वराज्यातील रयतेचे रक्षण केले.
२०२६ मध्ये त्याच दुर्गम सह्याद्रीतील डोंगरांनी रस्ते बांधणीत मोठे अडथळे निर्माण केले होते. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरिल लोणावळा घाटातील बॉटलनेक आणि तीव्र चढ-उतार यावर मात करण्यासाठी आधुनिक विज्ञानाने सह्याद्रीला शरण आणण्याऐवजी त्याच्याशी अत्याधूनिक अभियांत्रिकी तंत्राने मेळ घालत बोगद्यांचा मार्ग निवडला.
तंत्रज्ञानाचा कस: गनिमी कावा ते जागतिक तंत्रज्ञान उंबरखिंडीच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी निसर्गाचा शत्रूविरुद्ध वापर केला, तर मिसिंग लिंकमध्ये निसर्गाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आणले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीत मुघलांबरोबर लढाई करताना, येथे दगड, धोंडे आणि चाण अशी शस्त्रे होती, पण त्यांचा वापर वेळ आणि जागेच्या अचूक नियोजनाने केला आणि महारांजांनी लढाई जिंकली.
मिसिंग लिकची उभारणी करून तीचे रुपांतर कनेक्टिंग लिंकमध्ये करताना येथे ऑस्ट्रियाची न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) नॉर्वेची वेंटिलेशन सिस्टीम आणि जर्मनीची अवजड यंत्रसामग्री वापरली गेली. सह्याद्रीचा कठीण पाषाण फोडण्यासाठी जागतिक स्तरावरील अभियांत्रिकीची मदत घेवून अत्यंत कौशल्याने हे काम करुन गतीमान मार्ग निर्मितीचा लढई जिंकण्यात यश मिळवले.
वेळेचे महत्त्व आणि भौगोलिक अडथळे: उंबरखिंडीतील लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या काही तासांत कारतलब खानाला शरण येण्यास भाग पाडले. ही वेळेची लढाई होती.विजय अवघ्या काही तासांत मिळवण्यात आला होता.
आणि मिसिंग लिंकचा संबंध देखील वेळेशीच आहे. राज्यातील सत्ता बदलामुळे पाच ते सात वर्षांचा विलंब मिसिंग लिंकचे काम पूर्ण होण्याकरिता लागला असला तरी मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवासातील 6 किलोमीटरचे अंतर कमी होऊन प्रवासाची 25 मिनिटे वाचणार आहेत. हे आधुनिक काळातील वेळेवर मिळवलेले नियंत्रण आहे हे नाकारुन चालणार नाही.
महाराष्ट्राच्या शिरपेचातील मानाचे दोन तुरे: 1661 मध्ये उंबरखिंडीत मराठ्यांनी रक्ताचे पाणी करून स्वराज्य टिकवले, म्हणून आज आपण त्याच सह्याद्रीत मुक्तपणे प्रगतीची स्वप्ने पाहू शकत आहोत. उंबरखिंडीची ती ऐतिहासिक लढाई बुद्धिचातुर्याची पराकाष्ठा होती, तर मिसिंग लिंक ही मानवी जिद्दीची कमाल आहे. कालची खिंड शत्रूला रोखण्यासाठी होती, आजचा बोगदा समृद्धीला वेग देण्यासाठी आहे. सह्याद्रीच्या इतिहासातील हे दोन्ही अध्याय महाराष्ट्राच्या शिरपेचातील मानाचे तुरे आहेत.