RTE Pudhari
रायगड

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी 1 किमी अंतराची अट रद्द

आता 25 मार्चपर्यंत मुदतवाढ; अर्ज भरलेल्यानाही सवलत

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग ः बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश सन 2026-27 प्रक्रियेसाठी असलेली 1 किमी अंतराची अट रद्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार (ता.25) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या पालकांनी आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, त्यांना आता 1 ते 3 किमी. तसेच 3 किमी. पेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झालेल्या आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (सी) (1) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा या शाळांमध्ये आरटीई 25 टक्के सन 2026-27 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 1 किमी. पर्यंतच्या अंतरावरील शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य पालकांना देण्यात आलेले होते. तथापि, उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल याचिकेमध्ये न्यायालयाने नोंदविलेल्या निरिक्षणानुसार, आरटीई 25 टक्के प्रवेश जर 1 किमी. अंतरावर शाळा उपलब्ध नसेल तर मुलांना त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखता येणार नाही. त्यानुसार आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी ही 1 किमी अंतराची अट रद्द करण्यात आली आहे.

ज्या पालकांनी 01 किमी च्या आत असलेल्या शाळांची निवड करून अर्ज भरलेला आहे त्यांनाही आरटीई पोर्टलवर आपला आरटीई 25 टक्केचा अर्ज रद्द करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार संबंधित पालकांनी याबाबत आरटीई 25 टक्के पोर्टलवरून आवश्यक ती माहिती भरून सुधारित अर्ज करता येईल. तसेच आरटीई 25 टक्के प्रवेशासाठीचे अर्ज भरण्यास 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पालकांनी आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT