वरसे : नितीश सकपाळ
रोहा-अष्टमी नगरपरिषदेमध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील कामकाजावरून वाद गुरुवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 'घरकुल' योजनेतील एका लाभार्थ्याला वापर परवाना देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत नगरसेवक महेश कोलाटकर यांनी मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. या वादामुळे नगरपरिषद कार्यालयात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात काही काळ ठिय्या आंदोलनही केले.
नगरसेवक महेश कोलाटकर यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना सांगितले की, संबंधित लाभार्थ्याचा घरकुल वापर परवाना जाणूनबुजून अडवून ठेवला गेला असून तो मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे विनाकारण प्रलंबित ठेवून त्यांना वारंवार खेटे मारायला लावले जात आहेत.
प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी एसआयआर सह इतर शासकीय कामांचा अतिरिक्त ताण असल्याचे सांगत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शासकीय कामांचे कारण पुढे करून जनतेला वेठीस धरणे खपवून घेतले जाणार नाही, असा सडेतोड इशारा नगरसेवक कोलाटकर यांनी दिला.
कार्यालयातील वाद विकोपाला गेल्यानंतर अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी रोहा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
"कर्मचाऱ्यांच्या पाठीशी युनियन ठाम"
"कर्मचाऱ्यांच्या कारभाराबाबत तक्रार असल्यास नगरसेवकांनी नगराध्यक्ष किंवा मुख्याधिकाऱ्यांकडे रीतसर मांडणी करावी किंवा बैठकीत प्रश्न सोडावा. थेट अंगावर धावून जाणे आणि शिवीगाळ करणे अयोग्य आहे. अशा प्रकारांत युनियन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील,असे कर्मचारी संघटना अध्यक्ष राकेश पाटील यांनी सांगीतले.
"दुपारी पावणेबाराच्या सुमारास नगरसेवकांनी शिवीगाळ व धमकी दिल्याची माहिती अभियंता वरे यांनी दिली. यापूर्वीही लेखापाल मोकाशी यांच्यासोबत त्यांनी असाच प्रकार केला होता. मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी आश्वासन दिल्याने आम्ही दरवेळी शांत राहिलो. मात्र, ही घटना पुन्हा घडल्याने कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. आता आम्ही पुन्हा रोहा-अष्टमीकरांच्या सेवेत रुजू होत आहोत."सचिन दळवी (अध्यक्ष, महाराष्ट्र पालिका कर्मचारी संघटना)
"घरकुलाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी होत्या, त्या पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र, नगरसेवक महेश कोलाटकर आणि त्यांचा मुलगा अंगावर धावून आले व धमक्या देऊ लागले. अपुऱ्या मनुष्यबळात आम्ही कामे कशी पूर्ण करणार, हे मी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो.,असे नगर अभियंता संजय वरे यांनी सांगीतले.संजय वरे (नगर अभियंता, रोहा-अष्टमी नगरपरिषद)
नगरपरिषदेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. भ्रष्ट आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करावे, मी जनतेचा प्रतिनिधी आहे. नागरिकांच्या हक्काच्या लढ्यासाठी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरी मी मागे हटणार नाही.महेश कोलाटकर, नगरसेवक