Water Shortage file Photo
रायगड

Roha Water Shortage: रोहा पं.स.चा पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार

तालुक्यातील 20 गावांसह 7 वाड्यांवर पाणीटंचाईची शक्यता; टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना; विंधण विहिरींची होणार दुरुस्ती

पुढारी वृत्तसेवा

रोहे : महादेव सरसंबे

उन्हाळा चालू झाला आहे. जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतसे तालुक्यातील पाण्याचा प्रश्न काही गावातूंन पुढे येत आहे. तालुक्यातील काही गावात उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू लागते. याच अनुषंगाने रोहा पंचायत समितीच्या वतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

सध्या तरी पाणीटंचाई नसली तरी जसजसे ऊन वाढत जाईल तसतसे गावांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात होणार आहे. त्या दृष्टिकोनातूनच कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पंचायत समितीच्या कृती आराखड्यानुसार मार्चपासून पाणीटंचाई भाषणाची शक्यता आहे.

रोहा तालुक्यातील 20 गावे व 7 वाड्यांवर पाणीटंचाईची शक्यता मार्चपासूनच असल्याने रोहा पंचायत समितीच्यावतीने पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पंचायत समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या गावांच्या यादीत वासगाव आदिवासीवाडी, पाटणसई आदिवासीवाडी, पाटणसाई लावेचीवाडी, पिंगळसई साळवीवाडा, न्हावे, नवखार, सोनखार, धामणसई, गावठाण, इंदरदेव ठाकूरवाडी, इंदरदेव आराचीवाडी, धोंडखार, दापोली, करंजविरा, वावेपोटगे, वावेखार, शेणवई, शेणवईवाडी, डोंगरी, झोळांबे, निडी, लक्ष्मीनगर, भातसई, शेणवई आदिवासीवाडी, तळाघर, बोरघर, लांढर या गावांचा व आदिवासी वाड्यांचा समावेश आहे.

या गावांना पाणी टंचाई भासल्यास टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी साडेतेरा लाख रुपये प्रस्थापित करण्यात आले आहे.

रोहा तालुक्यातील गावांना पाणीटंचाई भासू नये यासाठी खबरदारी उपाय म्हणून नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने रोहा तालुक्यातील 10 गावे व 2 वाड्यांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी 24 लाख रुपये प्रस्तावित आहेत. तर तालुक्यातील 24 गावे व 14 वाड्यांवर विंधन विहिरीचे विशेष दुरुस्त करण्यात येत आहे यासाठी 15 लाखाचा खर्च अपेक्षित आहे याचं काम सुरू आहे.

दरम्यान रोहा तालुक्यात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत असतो. मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा रोहा तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात उपलब्ध होत असताना उन्हाळ्यात पाणीटंचाई हा प्रश्न प्रामुख्याने विचार करण्यासारखा आहे. दुसरीकडे रोहा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात आले आहेत. तरीसुद्धा पाणीटंचाई हा प्रश्न उन्हाळ्यात येतोच. यातील काही गावे दरवर्षी पाणीटंचाई म्हणून आराखड्यात येत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारमाही वाहणारी कुंडलिका नदी असताना सुद्धा कुंडलिका नदीच्या तीरावरील गावांना पाणीटंचाई भेडसावत असतो. रोहा तालुक्यात पावसाळ्यात मिळणारा मुबलक पाणी साठा, बारमाही वाहणारी कुंडलिका नदी, शासनाकडून सातत्याने नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होत असताना तालुक्यात उन्हाळ्यात पाणी टंचाई भासत असल्याने शासनाचे नियोजन फेल ठरत असल्याचे दिसून येते.

रोहा तालुक्यात गेले दहा पंधरा वर्षात उदंड अशा पाणीपुरवठ्याच्या योजना झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात निधी या योजनेसाठी खर्ची पडला आहे. कुठेही यातील काही योजनासाठी याचे नियोजन नसल्याचे दिसून येते. त्यातच 26 गाव पाणीपुरवठा योजनेचे महत्त्वाचे उदाहरण आहे. योजना असंख्य तरीसुद्धा उन्हाळ्यात पाणीटंचाई हे वास्तव रोहा तालुक्यातले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT