Roha Nagar Parishad Election Result 2025: रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपरिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गड कायम राखल्याचं चित्र आहे. एकूण 17 प्रभाग असलेल्या रोहा नगरपरिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तब्बल 14 नगरसेवक विजयी झाले असून, प्रतिस्पर्धी पक्षांना मोठा धक्का बसला आहे.
नगरसेवक पदाच्या निकालांमधून रोह्यात राष्ट्रवादीची एकहाती पकड मजबूत झाल्याचं दिसून येत आहे. बहुतांश प्रभागांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या सत्ताकारणात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या उमेदवार वनश्री शेडगे यांनी आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या सध्याच्या टप्प्यावर वनश्री शेडगे या सुमारे 4 हजार मतांनी पुढे असून, त्यांच्या विजयाकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. अंतिम निकालातही ही आघाडी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोहा शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाने केलेली संघटनात्मक बांधणी, स्थानिक प्रश्नांवर घेतलेली भूमिका आणि मतदारांशी थेट संपर्क याचा फायदा पक्षाला झाल्याचं बोललं जात आहे. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, शहरात जल्लोष पाहायला मिळत आहे. मात्र, प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.
एकंदर पाहता, रोहा नगरपरिषद निवडणूक निकालांमधून रायगड जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचं वजन कायम असल्याचा संदेश या निकालांनी दिला आहे.