रोहा: गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केले असून, नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे रोहा शहरासह परिसरातील अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे.
शहरात सर्वत्र पाणी, जनजीवन ठप्प
रोहा शहरातील रायकर पार्क आणि दमखाडी या नदीकाठच्या परिसरातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या भीषण परिस्थितीमुळे रोहा बाजारपेठ, मच्छी मार्केट आणि भाजी मार्केटमध्ये पाणी साचल्याने आज सकाळपासून बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली. व्यवसायिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
संपर्क तुटला; धाटाव औद्योगिक क्षेत्रावर परिणाम
कुंडलिका नदीच्या पुरामुळे अनेक भागांतील संपर्क तुटला आहे. विशेषतः रोहा-नागठणे आणि कोलाड या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. धाटाव औद्योगिक क्षेत्राकडे जाणारा मुख्य रस्ता (रोहा-कोलाड रोड) रात्रभर पाण्याखाली होता आणि सकाळीही रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी असल्याचे चित्र आहे. यामुळे कामावर जाणाऱ्या कामगारांची मोठी गैरसोय झाली असून त्यांना पोहोचता आले नाही.
अष्टमी आणि ग्रामीण भागातही फटका
रोहा शहरालगत असलेल्या अष्टमी गावात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्याने प्रचंड नुकसान झाले असून, संपूर्ण गाव जलमय झाले होते. याव्यतिरिक्त भुवनेश्वर, वरसे आणि रोठ खुर्द यांसारख्या नदीकाठच्या गावांमध्येही पुराचे पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या आणि पुराच्या भीतीमुळे नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली.
प्रशासनाकडून मदत कार्य सुरू
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रोहा महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासन सतर्क झाले आहे. रात्रभर मदत कार्य सुरू होते आणि आजही प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शहराच्या काही भागांत अद्यापही पाणी साचलेले असून, प्रशासन नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहे. या पुराच्या परिस्थितीमुळे सध्या रोहा आणि परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, पाणी ओसरल्यानंतरच नुकसानीचा खरा आकडा समोर येणार आहे.