Roha Fertilizer Scam Pudhari
रायगड

Roha Fertilizer Scam: खरिपाच्या तोंडावर रोह्यात खतांचा काळाबाजार

शासकीय अनुदानाचा ३.५४ लाखांचा खतसाठा गायब; कृषी सेवा केंद्र मालकावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

रायगड: रोहा शहरातील 'शेतकरी कृषी सेवा केंद्र' या दुकानातून शासकीय अनुदानावर आलेला लाखो रुपयांचा खतसाठा गायब करून त्याची अनधिकृतपणे विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

खत नियंत्रण आदेश १९८५ आणि जीवनावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन करून ३,५४,५१३ रुपये किमतीचा खतसाठा काळ्या बाजारात विकल्याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या या धाडसी कारवाईमुळे रोहा परिसरातील खत माफियांचे धाबे दणाणले आहेत.

रोहा तालुका कृषी अधिकारी योगेश सुधाकर सुरडकर (वय ३५ वर्ष) आणि त्यांच्या पथकाने ११ जून २०२६ रोजी संध्याकाळी ४ वाजता या केंद्रावर अचानक छापा टाकला. खताच्या पोस मशीनमधील नोंदी आणि गोदामातील साठा यांची प्रत्यक्ष तपासणी केली असता, हा संपूर्ण साठा (किंमत ३ लाख ५४ हजार ५१३ रुपये) जागेवर उपलब्ध नसल्याचे आणि तो गायब असल्याचे निदर्शनास आले. तपासणीत अभिलेख आणि बिल उपलब्ध नसणे तपासणी दरम्यान दुकानात खरेदी चलने, खत साठा नोंदवही, खत विक्री रजिस्टर आणि पीओएस मशीनमधील नोंदींचे कोणतेही दस्तऐवज आढळून आले नाहीत.

हा साठा अधिकृतपणे शेतकऱ्यांना न विकता, औद्योगिक कारणांसाठी किंवा अनधिकृतपणे काळ्या बाजारात चढ्या दराने विकल्याचा तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. कायद्याचे सर्रास उल्लंघन विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे खताची साठवणूक तसेच विक्री करून शासनाच्या नियमांना पूर्णपणे हरताळ फासण्यात आला आहे.

यामोठ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने सर्व शेतकरी आणि खत विक्रेत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे, शेतकऱ्यांनी पावतीशिवाय खते खरेदी करू नयेत. तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी खत खरेदी करताना 'पोस' मशीनची मूळ पावती आणि अधिकृत बिल घेण्याचा आग्रह धरावा.

छापील दरापेक्षा जास्त किमतीने खत विक्री होत असल्यास त्याची तात्काळ तक्रार करावी. काळाबाजार करणाऱ्यांचीमाहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रासायनिक खतांचा बेकायदेशीर साठा, लिंकेज (खतासोबत इतर औषधे किंवा वस्तू घेण्याची सक्ती) किंवा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास तात्काळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव संपूर्णपणे गुप्त ठेवले जाईल.

नियमबाह्य काम करणाऱ्या विक्रेत्यांना कडक इशारा देण्यात आला आहे. सर्व परवानाधारक खत विक्रेत्यांनी साठा फलक आणि किंमत फलक दुकानात स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. खतांची साठवणूक आणि विक्री अधिकृत अभिलेखाप्रमाणेच झाली पाहिजे. यामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा काळाबाजार आढळल्यास थेट परवाना रद्द करून फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असेही कृषी विभागाने म्हटले आहे.

बेकायदेशीर विक्री आणि फसवणूक

याप्रकरणी रोहा तालुका कृषी अधिकारी योगेश सुधाकर सुरडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नितेश शाम सुतार (मालक, शेतकरी कृषी सेवा केंद्र, रोहा) याच्याविरुद्ध खत नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार बेकायदेशीर खत साठवणूक, विक्री आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पंच साक्षीदार मिलिंद यशवंत राऊत आणि केशव होनाजी यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा केला असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास रोहा पोलीस करत आहेत.

४९० बॅग युरियासह १२० बॅग सुफला गायब

शासकीय दस्तऐवजानुसार, 'श्री समर्थ खत एजन्सी, वडखळ' (ता. पेण) यांच्याकडून रोहा येथील 'शेतकरी कृषी सेवा केंद्र' (मालक नितेश शाम सुतार) या दुकानाला खालील खतसाठा प्राप्त झाला होता. निम कोटेड युरिया: ४९० बॅग (प्रत्येकी ४५ किलो वजनाची) एकूण किंमत १ लाख २२ हजार ५३९ रुपे. सुफला (१५:१५:१५): १२० बॅग (प्रत्येकी ५० किलो वजनाची) एकूण किंमत २ लाख ३१ हजार ९७४ रुपये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT