Roha Flyover Pudhari
रायगड

Roha Flyover: साडेचार वर्षे झाली तरी उड्डाणपूल अधुराच! रोहा अष्टमी रेल्वे फाटकामुळे प्रवाशांची रोजची कोंडी

रोहा तालुक्यातील अष्टमी रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे काम गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असून संथगतीमुळे अद्याप पूर्ण झालेले नाही. कोकण व मध्य रेल्वेच्या गाड्यांमुळे फाटक वारंवार बंद होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

पुढारी वृत्तसेवा

महादेव सरसंबे

रोहे: रोहा तालुक्यातील अष्टमी येथे रेल्वे क्रॉसिंग वर उड्डाणपुलाचे काम चालू आहे. उड्डाणपूल चे काम लवकर पूर्ण होत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कोकण व मध्य रेल्वेच्या रेल्वे गाड्या सातत्याने जात असल्याने या मार्गावर सातत्याने रेल्वे फाटक पडत असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे.

गेली साडेचार वर्ष अष्टमी रेल्वे फाटक वरील उड्डाणपुलाचे काम चालू आहे. काम धिम्या गतीने चालू असल्याने उड्डाण पुलाचे काम कधी पूर्ण होणार असा सवाल प्रवासही वर्गातून विचारला जात आहे.

कोकण रेल्वे मार्गावर व मध्य रेल्वे मार्गावर हंगामी सह नियमित रेल्वे गाड्या चालत असल्याने अष्टमी रेल्वे फाटक सातत्याने बंद राहत आहे. रेल्वे फाटक पलीकडील मेढा, नागोठणे, धामणसई या परिसरातील नागरिक नोकरी व्यवसाय विविध शासकीय कामासाठी, व शाळेत विद्यार्थी तालुक्याचे ठिकाण असलेल्या रोहाकडे सातत्याने येत असतात.

पुणे, मुंबई, अलिबाग आदी मोठ्या शहराकडे जाणाऱ्या नागरिकांना याच मार्गातून प्रवास करावा लागत असतो. परंतु रेल्वे फाटक पडत असल्याने या मार्गावर असणाऱ्या सर्व प्रवाशांना फटकामुळे त्रास सहन करावा लागतो.

सगळ्यात जास्त त्रास धाटाव औद्योगिक क्षेत्रात, नागोठणे येथील रिलायन्स व औद्योगिक क्षेत्रात कामासाठी जाणाऱ्या कामगारांना त्रास सहन करावा लागत असल्याने कधी कधी त्यांची रजाही लागत आहे.

दुसरीकडे रिक्षा व्यवसायिक व मिनीडोअर व्यवसायिक यांनाही सतत पडत असलेल्या फाटकामुळे आर्थिक त्रासही सहन करावा लागतो.

२०२२ ला चालू झालेल्या उड्डाणपुलाचे काम धीम्या गतीने चालू आहे. हा काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न प्रवासी वर्गातून विचारला जात आहे. आता नेहमीच रेल्वे गाड्या सह हंगामी व विशेष गाड्या वाढल्याने हे रेल्वे फाटक सातत्याने पडत आहे.

त्यामुळे या मार्गावर व्यवसाय निमित्ताने व अन्य कारणास्तव येणाऱ्या प्रवाशांना या फटका चा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे फाटक उघडेपर्यंत ताटकळत बसावे लागत आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक जास्त त्रास गणेशोत्सव, दिवाळीमध्ये प्रवाशांना होताना दिसत आहे. दिवाळी विशेष गाड्या व गणपती विशेष गाड्या सोडत असल्याने हे फाटक सातत्याने पडत आहे.

उड्डाणपुलाचे काम चालू असल्याने बाजूला सर्विस रोड काढण्यात आले आहे. परंतु हे सर्विस रोडवर काही ठिकाणी खड्डे असल्याने सातत्याने अपघात होताना दिसत आहे.

खा.सुनील तटकरे, ना.आदिती तटकरे, व आ.अनिकेत तटकरे यांनी या बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन या उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर कसे होईल याकडे लक्ष दिल्यास नागरिकांना होणाऱ्या त्रासा पासून दिलासा मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT