गुन्ह्यांमुळे कशेडी घाटातील सुरक्षेची ऐशीतैशी pudhari photo
रायगड

Kashedi Ghat security concerns : गुन्ह्यांमुळे कशेडी घाटातील सुरक्षेची ऐशीतैशी

पोलादपूर हद्दीत तिसऱ्या डोळ्याची आवश्यकता ,रात्रीची पोलीसगस्त वाढविण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर ः समीर बुटाला

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला निसर्गाचे वरदान लाभलंय खर,पण त्याचबरोबरच विविध गुन्ह्यांमुळे या घाटाची नाहक बदनामी होताना दिसत आहे.यामुळे घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.खून करुन त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी कशेडीघाटाचा सर्रासपणे वापर केला जात आहे.या घटनांचा शोध घेताना पोलिसांचीही दमछाक होते.यासाठी या घाटावर नजर ठेवण्यासाठी आता तिसऱ्या डोळ्याची अर्थात सीसीटीव्ही गरज भासू लागली आहे.शिवाय दोन्ही बाजूकडून रात्रीची गस्त वाढविणे गरजेचे बनले आहे.

गेल्या वर्षी एप्रिल 2025 मध्ये पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने तिच्या साथीदारासह चालत्या कारमधून एका व्यक्तीचा ओढणीने गळा आवळून ठार मारून त्याचे प्रेत कशेडी घाटातील जुन्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या सिमेंट काँक्रीटच्या भिंतीलगत फेकून पलायन केले होते.त्या नंतर नुकतीच आंबेनळी घाटात जळलेल्या अवस्थेत महिलेचा मुतदेह सापडल्याने दोन्ही घाट माथ्यावर तिसऱ्या डोळ्यांची आवश्यकता व रात्रीची ग्रस्त वाढविणे गरजेचे बनले आहे.

गेल्या वर्षी एप्रिल 25 मध्ये कशेडी घाट परिसरातील एका काँक्रीटच्या भिंतीलगत एका पुरूषाचे प्रेत सापडल्यानंतर त्याच्या मारेकरी प्रेयसी आणि तिच्या साथीदाराचा यशस्वीरित्या शोध पोलादपूर पोलिसांनी घेतला होता.त्यानंतर पुन्हा अशाच एका काँक्रीटच्या भिंतीच्या मोरीच्या पाईपामध्ये महिलेचे जळलेले प्रेत आढळल्याने आव्हान उभे ठाकले आहे. महिलेच्या खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी जाळले असण्याची शक्यता पोलीसांकडून वर्तविण्यात आली असून आंबेनळी घाटात ‌‘घडलेल्या घटने नंतर पोलादपूरकर हादरल्याचे दिसून आले.

मृत महिलेल्या जळलेल्या अवस्थेतील प्रेताच्या दोन्ही पायामध्ये चांदीची जोडवी असून हाताच्या बोटामध्ये सोन्याची अंगठी व लाल खडा असल्याचे दिसून आले. मृतदेह ताठरता आलेल्या अवस्थेत असल्याने जाळण्यापूर्वीच महिलेचा खुन झाल्याची प्राथमिक शक्यता दिसून आली.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, मागील काही दिवसांत रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या महिलांच्या तक्रारींचा आढावा घेतला जात आहे. तसेच मोबाईल लोकेशन, स्थानिक माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असून त्यातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाट, कशेडी घाट तसेच डोंगरदऱ्यांतील भागांमध्ये अशाप्रकारे स्त्री-पुरूषांचे खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा प्रकार अनेकपर्षांपासून सातत्याने होत असल्याने दिवसरात्र गस्तीपथक तसेच आवश्यक तिथे सीसीटिव्ही कार्यरत करण्याची मागणी पोलादपूकरांकडून व्यक्त होत आहे.

कशेडी घाटातील वळणावर तसेच उतारावर अपघात घडत आहेत. या मार्गाप्रमाणे रायगडमधून पश्चिम महाराष्ट्रात जाण्या साठी असलेला पोलादपूर सुरूर मार्गावरील आंबेनळी घाट सातारा हद्दीत काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी खोदण्यात आला आहे.

महाबळेश्वर हद्दीत अनेकदा अनेक घटना घडत असल्याने त्या भागात सुद्धा तिसऱ्या डोळ्यांची आवश्यकता निर्माण झाली आहे.

तातडीच्या उपाययोजनांची गरज

पोलादपूर शहरातील काही ठिकाणी सीसीटीव्ही आहेत त्यामध्ये वाढण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचा अपडेट पोलीस ठाणे नगरपंचायत कार्यालयात देणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे महामार्गावर अपघातांची शक्यता वाढीस लागली आहे. सद्य स्थितीत अपघाताचे प्रमाण कमी असले तरी भविष्याचा वेध घेत अपघात रोखण्यासाठी आतापासून उपाययोजना राबविणे क्रमप्राप्त बनले आहे कशेडी टॅप ची पोलीस यंत्रणा सज्ज असली तरी ठिकठिकाणी तिसऱ्या डोळ्यांची आवश्यकता निर्माण झाली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT