Rewas Karanja Creek Bridge: रेवस-करंजा खाडी पुलाच्या कामाला अखेर गती Pudhari
रायगड

Rewas Karanja Creek Bridge: रेवस-करंजा खाडी पुलाच्या कामाला अखेर गती

आतापर्यंत 25 टक्के काम पूर्ण; मार्च 2028 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

पुढारी वृत्तसेवा

उरण : राजकुमार भगत

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गावरील अत्यंत कळीच्या रेवस-करंजा खाडी पुलाच्या कामाला आता प्रत्यक्ष वेग आला आहे. मुंबई आणि कोकणाला थेट जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सुमारे 22 ते 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर येत्या डिसेंबर 2026 पर्यंत 50 टक्के काम पूर्ण करण्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

10.2 किमीचा प्रवास हा प्रकल्प केवळ खाडीपुरता मर्यादित नसून, त्याचे नियोजन अत्यंत भव्य आहे. करंजा आणि रेवस खाडीच्या मध्यभागी 2.4 किलोमीटर लांबीचा मुख्य पूल बांधला जात आहे. पुलाला जोडण्यासाठी करंजा बाजूला 4 किलोमीटर आणि रेवस बाजूला 4 किलोमीटर असा एकूण 8 किलोमीटरचा पूल जमिनीवर बांधला जाणार आहे. सध्या खाडीमध्ये साधारण 12 ते 13 पिअर (खांब) उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, समुद्रात मोठे दगड टाकून मार्ग तयार केला जात आहे. 1980 साली प्रथम या मार्गाची घोषणा झाली होती. मात्र, विविध कारणांमुळे हा प्रकल्प रखडला होता. आता 2 हजार 478 कोटी रुपयांच्या निविदेसह या पुलाचे काम प्रत्यक्ष सुरू झाले असून, मार्च 2028 पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची दाट शक्यता आहे.

द्रोणागिरी पर्वताचे संरक्षण आणि स्थानिकांचा विरोध प्रकल्प प्रगतीपथावर असतानाच, करंजा येथील चाणजे महसूल हद्दीतील जमीन संपादनाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशी रस्ता नेल्यास डोंगर उत्खननामुळे पर्यावरणाला आणि ऐतिहासिक पर्वताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या मार्गाचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे मुंबई (जेएनपीटी) ते अलिबाग हे अंतर 55 किमीवरून थेट 30 किमीवर येईल. पेण-पनवेलचा लांबचा वळसा घालण्याची गरज उरणार नाही. मुंबईतील सागरी सेतू मार्गे द्रोणागिरी नोडमधून थेट कोकणात प्रवेश करणे सुलभ होईल.

रेवस-करंजा पुलाचे काम गतीने सुरू असून, आगामी वर्षअखेरपर्यंत आम्ही 50 टक्के टप्पा गाठू. 2028 पर्यंत हा पूल पूर्ण झाल्यावर कोकण आणि मुंबई दरम्यानचे अंतर लक्षणीयरीत्या कमी होईल.
अनिरुद्ध बोराडे, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT