रेवदंडा : महेंद्र खैरे
अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्याला मध्यवर्ती असलेला रेवदंडा येथील समुद्र किनारा पर्यटकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. निसर्गरम्य वातावरण, बागायतीमुळे निर्माण होणारे थंड हवामान आणि लांबलचक समुद्रकिनारा यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या तसेच आठवड्याच्या शेवटी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
सकाळपासूनच पर्यटक समुद्रस्नान, फेरफटका व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी किनाऱ्यावर दाखल होत आहेत. समुद्रकिनाऱ्यालगत नारळ पाणी, शहाळे व विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांचीही चांगली वर्दळ दिसून येत आहे. स्थानिक व्यावसायिकांनाही त्यामुळे रोजगार उपलब्ध होत आहे.
रेवदंड्याच्या पश्चिमेस सुमारे दोन किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून तो पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. विशेषतः प्रि-वेडिंग शूटसाठी रेवदंडा बीचला मुंबई, ठाणे, पुणे, बारामती, नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक फोटोग्राफर्सची पसंती मिळत आहे. निसर्गरम्य परिसर, ऐतिहासिक आगरकोट किल्ल्याची तटबंदी आणि समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य यामुळे येथे दररोज प्रि-वेडिंग शूटसाठी गर्दी होताना दिसते.
पर्यटकांच्या सोयीसाठी स्थानिकांकडून समुद्रालगतच्या बागायती परिसरात स्वस्त व मस्त टेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच रेवदंडा समुद्रकिनारा सुरक्षित मानला जात असल्याने कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांचे हे आवडते पर्यटनस्थळ बनले आहे.
मात्र वाढत्या पर्यटकांमुळे
समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक बाटल्या, कचरा व इतर टाकाऊ वस्तूंचा प्रश्न गंभीर बनत आहे. किनाऱ्यावर ठिकठिकाणी पडलेल्या कचऱ्यामुळे परिसराच्या सौंदर्याला बाधा निर्माण होत असून पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने नियमित स्वच्छता मोहीम राबवून पर्यटकांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पर्यटकांनीही समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ओळखून कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे.