Raigad tourism: रायगडमध्ये उन्हाळी पर्यटनाला बहर; महागाईचा चटका असूनही पर्यटकांचा ओघ कायम

जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बहरली
Raigad tourism
Raigad tourismPudhari
Published on
Updated on

संतोष उतेकर

सुधागड: जैवविविधतेने नटलेले विलोभनीय निसर्ग सौंदर्य व विस्तीर्ण समुद्र किनारा तसेच ऐतिहासिक व धार्मिकस्थळे यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्याकडे वळतात. नुकत्याच उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यामधील पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. कमर्शियल सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे खाण्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे त्याचा भूर्दंड ग्राहकांना बसत आहे.

पुणे-मुंबईसह महाराष्ट्र व राज्याबाहेरील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळतात. सध्या सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबुन असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, छोटे-मोठे दुकानदार, वाहतूकदार, राईड्सवाले यांची सध्या चलती आहे.

जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. तसेच अष्टविनायकांपैकी दोन गणपती रायगडमध्ये असल्याने खालापूर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागडमधील पालीचा बल्लाळेश्वर येथे भाविकांची रिघ लागली आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शिवप्रेमींची गर्दी वाढत आहे.

मुरुड आणि अलिबागमध्ये येणारे पर्यटक ऐतिहासिक जंजिरा आणि कुलाबा किल्ल्याला आवर्जून भेट देत आहेत, तर दक्षिण काशी हरिहरेश्वरमध्ये देवदर्शन आणि समुद्रकिनारा असा दुहेरी संगम पर्यटकांना आकर्षित करत आहे.

समुद्रकिनारे फुल्ल

अलिबाग- नागाव, वरसोली, मुरुड- काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. हे सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. घोडागाडी, एटीव्ही राईड्स, घोडा व उंट सफारी पर्यटक याचा आनंद घेत आहेत.

ॲग्रो टुरिझम आणि फार्महाऊसची क्रेझ

शहरी पर्यटकांना ग्रामीण भागातील रिसॉर्ट, फार्म हाऊस आणि ऍग्रो टुरिझमचे मोठे आकर्षण आहे. निसर्गरम्य वातावरणात शुद्ध हवा आणि चुलीवरच्या सात्विक जेवणाचा आनंद पर्यटक घेत आहेत. मोबाईल नेटवर्कपासून दूर राहून रिफ्रेश होण्याकडे पर्यटकांचा कल असून, स्विमिंग पूल असलेल्या रिसॉर्ट्सना अधिक मागणी आहे. ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि टेंटमधील वास्तव्याचा अनुभव युवा वर्गासाठी खास आकर्षण ठरत आहे.

वाहतूककोंडीचा ताप

मोठ्या प्रमाणावर पर्यटक व चाकरमानी रायगडमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग, पुणे बेंगलोर हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस वे व अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण आला असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी या वाहतूक कोंडीचा ताप पर्यटक व प्रवाशांना होताना दिसत आहे.

उन्हाळी हंगामामुळे पर्यटकांची संख्या अचानक वाढली आहे. सुरुवातीला व्यावसायिक गॅसच्या टंचाईचा काहीसा परिणाम झाला होता, मात्र आता परिस्थिती सुरळीत आहे. होमस्टेमध्ये पर्यटकांना चुलीवरचे जेवण अधिक आवडते. किमतीत थोडी वाढ झाली असली, तरी पर्यटकांचे बुकिंग कायम असून समुद्रकिनारे फुल्ल आहेत. पर्यटक समुद्र किनारी राहणे व मज्जा करणे पसंत करतात.

- सिद्धेश कोसबे, व्यावसायिक, दिवेआगर

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटक व भाविक अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. आलेले भाविक आवर्जून त्यांना काही खरेदी करतात. त्यामुळे व्यवसाय देखील चांगला होत आहे. उन्हाळी सुट्ट्या संपेपर्यंत भाविकांचा ओघ कायम राहील.

- राहुल मराठे, व्यवसायिक, बल्लाळेश्वर मंदिर, पाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news