पनवेल: मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सध्या तीन ते चार तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र, रेवस-करंजा समुद्री पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे अंतर ४५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.
उरण तालुक्यातील करंजा आणि अलिबाग तालुक्यातील रेवस यांना धरमतर खाडीवरून जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे.
सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम नोव्हेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठेवले आहे.
या प्रकल्पांतर्गत १० किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित करण्यात येणार असून, त्यामध्ये दोन किलोमीटर लांबीच्या समुद्री पुलाचा समावेश आहे. या पुलाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ४५ मीटर असणार आहे.
केबल स्टेड गर्डर तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे पुलाखालून मोठ्या मालवाहू जहाजांची वाहतूकही विनाअडथळा सुरू राहू शकणार आहे. या वैशिष्ट्यामुळे जलवाहतूक आणि रस्ते वाहतूक यांचा समतोल साधण्यास मदत होणार आहे.
रेवस-करंजा पूल पूर्ण झाल्यानंतर अलिबाग, उरण, पनवेल आणि मुंबई यांच्यातील प्रवास अधिक वेगवान होणार आहे. विशेषतः जेएनपीए बंदर, अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना या मार्गामुळे अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळण्याची अपेक्षा आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने अलिबागसह रायगडच्या किनारपट्टीवरील भागांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच आयात-निर्यात व्यापार, मालवाहतूक, औद्योगिक विकास आणि स्थानिक रोजगाराच्या संधींनाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ चर्चेत असलेला रेवस-करंजा समुद्री पूल आता प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. नोव्हेंबर २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई आणि अलिबागमधील अंतर केवळ भौगोलिकदृष्ट्याच नव्हे, तर प्रवासाच्या वेळेच्या दृष्टीनेही कमी होणार आहे.
४५ वर्षांची प्रतीक्षा संपणार
विशेष म्हणजे, रेवस-करंजा पुलाची संकल्पना १९८१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळात मांडण्यात आली होती. मात्र, विविध कारणांमुळे गेल्या सुमारे ४५ वर्षांपासून हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या प्रतीक्षेत होता.
आता या प्रकल्पाला गती मिळाली असून, उरणचे भाजप आमदार महेश बालदी गेल्या दहा वर्षांपासून मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाच्या पूर्ततेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.