पोलादपूर : पोलादपूर ते महाबळेश्वर परिसरातील कोणतीही दुर्घटना, खोल दरीतील अपघात, हरवलेल्या व्यक्तींचा शोध किंवा नैसर्गिक आपत्तीची घटना घडली की सर्वप्रथम मदतीसाठी धावून येतात ते स्थानिक रेस्क्यू करणाऱ्या टीम या मध्ये , सह्याद्री , नरवीर , सिस्केप , मदत गृप सह महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम.आदी सह इतर जिल्ह्यातील टीम ला आधुनिक बचाव साहित्य सह आर्थिक मदतीची निकड भासत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
गेल्या जवळपास दोन दशकांपासून सर्व टीम कोणत्याही शासकीय लाभाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने समाजसेवा करत आहे. मात्र जीव धोक्यात घालून समाजासाठी काम करणाऱ्या या स्वयंसेवकांना आजही आवश्यक साधनसामग्री, आर्थिक आधार आणि शासकीय सन्मानापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
प्रतापगड आणि आंबेनळी घाट ,कशेडी घाट वरंध घाट , सावित्री दुर्घटना , आदी परिसरातील अनेक भीषण दुर्घटनांमध्ये या टीमने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. शेकडो फूट खोल दऱ्यांमध्ये उतरून जखमींना बाहेर काढणे, मृतदेहांचा शोध घेणे, जंगलामध्ये हरवलेल्या व्यक्तींचा माग काढणे, पूरग्रस्त भागात मदतकार्य करणे अशा अत्यंत धोकादायक मोहिमा या स्वयंसेवकांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. अनेकदा रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहिमांमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी कर्तव्य बजावले आहे.
आंबेनळी घाटातील भीषण दुर्घटनेतही या टीमने दाखवलेले धाडस आणि अथक परिश्रम संपूर्ण राज्याने पाहिले. अशा प्रत्येक वेळी समाजातून त्यांच्या कार्याचे कौतुक होते, मदतीच्या घोषणा दिल्या जातात आणि आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्याची आश्वासने दिली जातात. मात्र काही दिवसांनंतर त्या घोषणा हवेत विरून जातात आणि प्रत्यक्ष मदत मात्र मिळत नाही, अशी भावना टीमच्या सदस्यांमध्ये आहे.
बचावकार्य अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी आधुनिक दोरखंड प्रणाली, रेस्क्यू स्ट्रेचर, ड्रोन, अत्याधुनिक सर्च लाईट्स, कम्युनिकेशन उपकरणे, हेल्मेट, सुरक्षा किट्स आणि इतर आवश्यक साहित्याची नितांत गरज असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. या साधनांअभावी अनेक मोहिमा अधिक कठीण बनतात. तरीही समाजसेवेच्या भावनेतून हे स्वयंसेवक आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवत आहेत.
समाजासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या स्वयंसेवकांचा शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या अशा प्रशिक्षित आणि अनुभवी जवानांना शासकीय भरती प्रक्रियेत विशेष आरक्षण किंवा प्राधान्य दिले जावे. तसेच त्यांच्या सेवेला मान्यता देत किमान मानधनाची व्यवस्था शासनाने सुरू करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्वयंसेवकांना केवळ शाबासकी नको
जे युवक कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता लोकांचे प्राण वाचवण्यासाठी धोकादायक परिस्थितीत उतरतात, त्यांची दखल घेणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला होऊ शकतो. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण, विमा संरक्षण, आधुनिक साहित्य आणि आर्थिक सुरक्षा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या या स्वयंसेवकांना केवळ कौतुकाची थाप नव्हे, तर प्रत्यक्ष मदत, शासकीय संरक्षण आणि भविष्यासाठी आधार मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत आता सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.