विक्रम बाबर
पनवेल : रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुई गावातील रिक्षाचालक श्री. परशुराम बबन भोपी यांनी सामाजिक बांधिलकी जपत कामोठे-जुई परिसरातील महिला भगिनींसाठी अनोखा उपक्रम जाहीर केला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना कामोठे ते रेल्वे स्टेशन असा मोफत रिक्षा प्रवास करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण म्हणून साजरा केला जातो. या सणाचे औचित्य साधत श्री. भोपी यांनी आपल्या रिक्षा सेवेतून महिलांना प्रवासाची सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. शहरातील अनेक भागांत रिक्षाचालकांच्या मनमानी भाडे आकारणी, प्रवाशांशी गैरवर्तन तसेच विविध कारणांवरून रिक्षा सेवांबाबत तक्रारी होत असतात. मात्र, कामोठे-जुई-नौपाडा परिसरातील रिक्षाचालक याला अपवाद ठरत असून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम अनेकदा त्यांच्या माध्यमातून दिसून येते.
प्रवाशांना सुरक्षित व सहकार्याची सेवा देण्यासोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही रिक्षाचालक सहभागी होत असल्याचे चित्र या परिसरात पाहायला मिळते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने श्री. परशुराम भोपी यांनी घेतलेला हा निर्णय त्याच सामाजिक जाणीवेचे आणखी एक उदाहरण ठरले आहे. ‘महिला भगिनींप्रती आदर आणि बंधुभाव व्यक्त करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे,’ अशी भावना या उपक्रमामागे असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या या उपक्रमामुळे रिक्षाचालकांकडे केवळ प्रवासी वाहतूक करणारे म्हणून न पाहता समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून पाहण्याची सकारात्मक भावना निर्माण होत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांसाठी मोफत प्रवासाची सुविधा देण्याच्या या उपक्रमाचे कामोठे-जुई परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. इतर रिक्षाचालकांनीही अशा सामाजिक उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.