Narali Purnima Raksha Bandhan Festival | नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन

Narali Purnima Raksha Bandhan Festival |
Narali Purnima Raksha Bandhan Festival | नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन
Published on
Updated on

अनिल दिवसे

श्रावण पौर्णिमा म्हणजे नात्यांतील प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या समृद्ध भारतीय परंपरांचा संगम. रक्षाबंधनापासून नारळी पौर्णिमेपर्यंतचा हा उत्सव मानवी नात्यांसोबतच निसर्ग, उपजीविका आणि सहजीवनाचे महत्त्व अधोरेखित करतो.

आपली धार्मिक अन्‌ सांस्कृतिक परंपरा निसर्ग, उपजीविका, सामाजिक बांधिलकी आणि मानवी कृतज्ञतेशी घट्ट जोडलेली आहे. श्रावण पौर्णिमा हा त्याच सांस्कृतिक समृद्धीचा दिवस. देशाच्या विविध भागांत हा दिवस रक्षाबंधन, राखी पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा अशा विविध नावांनी साजरा होताे. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर या दिवसाला विशेष महत्त्व आहे. समुद्राला जीवनाचा आधार मानणाऱ्या कोळी समाजासाठी हा दिवस ‘नारळी पौर्णिमा’ म्हणून श्रद्धा, परंपरा आणि व्यवसायाशी जोडला गेला आहे. किनारी भागातील नारळी पौर्णिमेची परंपरा म्हणूनच आजही लोकजीवनाचा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक ठेवा आहे.

कोळी समाजासाठी समुद्र उपजीविकेचा आधार आहे. पिढ्यान्‌पिढ्या मासेमारीवर जीवन जगणाऱ्या या समाजाने समुद्राला दैवताचे स्थान दिले आहे. श्रावण पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राची पूजा करतात. नारळ, फुले आणि नैवेद्य अर्पण करून समुद्र शांत राहावा, नौका सुरक्षित राहाव्यात आणि मासेमारीचा हंगाम सुखकर जावा, अशी प्रार्थना केली जाते. नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करण्यामागे समुद्रदेवतेचा आशीर्वाद मिळावा, समुद्रातील संकटांपासून संरक्षण मिळावे आणि मासेमारीचा काळ समृद्ध जावा, अशी श्रद्धा आहे. या परंपरेतून निसर्गाकडून मिळणाऱ्या साधनसंपत्तीबद्दल कृतज्ञ राहण्याचा संदेशही मिळतो.

नौका समुद्रात उतरवण्यापूर्वी त्यांची साफसफाई, रंगरंगोटी आणि पूजा केली जाते. सुरक्षित आणि भरभराटीचा हंगाम सुरू व्हावा, हीच त्यामागची भावना असते. पारंपरिक पोशाख, कोळी गीते आणि नृत्य यामुळे किनारपट्टीवर उत्सवी वातावरण निर्माण होते. या दिवशी नारळी भात, नारळाच्या करंज्या आणि इतर गोड पदार्थ तयार केले जातात. नारळ हा कोकणी खाद्यसंस्कृतीचाही अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सणाच्या निमित्ताने धार्मिक श्रद्धा, स्थानिक खाद्यपरंपरा आणि कौटुंबिक आनंद यांचा सुंदर संगम घडतो. नारळी पौर्णिमेचा सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे कृतज्ञता आणि सहजीवन. समुद्र देतो म्हणून त्याचा उपभोग घ्यायचा; पण त्याचे रक्षण करण्याची जबाबदारीही स्वीकारायची, हा या परंपरेचा गाभा आहे. कोळी समाजाच्या जीवनात समुद्र हा अन्‍न, रोजगार आणि संस्कृतीचा आधार आहे. त्यामुळे समुद्राची पूजा म्हणजे प्रत्यक्षात निसर्गशक्तीचा सन्मान होय.

श्रावण पौर्णिमेलाच रक्षाबंधन साजरे केले जाते. त्यामुळे एका बाजूला भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि संरक्षणाचे प्रतीक असलेले रक्षाबंधन, तर दुसऱ्या बाजूला समुद्र आणि उपजीविकेचे नाते जपणारी नारळी पौर्णिमा, असा या दिवसाचा व्यापक सांस्कृतिक आविष्कार दिसतो. रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील प्रेम, विश्वास, आपुलकी आणि परस्पर जबाबदारी जपणारा महत्त्वाचा सण आहे.

बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधणे आणि भावाने तिच्या रक्षणाचे आश्वासन देणे, एवढ्यापुरतीच या सणाची व्याप्ती मर्यादित नाही. काळानुसार रक्षाबंधनाच्या परंपरेचा अर्थही व्यापक झाला आहे. रक्ताच्या नात्यांपलीकडे जाऊन मित्र-मैत्रिणी, गुरू-शिष्य, सामाजिक बांधिलकीची नाती आणि समाजातील विविध घटकांमधील परस्पर विश्वास व्यक्त करण्याचे माध्यम म्हणूनही राखीचे महत्त्व वाढले आहे. भारतीय परंपरेत राखी ही केवळ धाग्याची वस्तू नसून नात्यांना जोडणारे आणि संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची आठवण करून देणारे प्रतीक मानले जाते.

रक्षाबंधनात माणूस आपल्या प्रिय व्यक्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारतो, तर नारळी पौर्णिमेत कोळी समाज आपल्या उपजीविकेचा आधार असलेल्या समुद्राच्या सामर्थ्याचा आदर करून त्याच्या कृपेची प्रार्थना करतो. अशाप्रकारे एकाच पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या या दोन परंपरा मानवी नात्यांचे रक्षण आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचे जतन, या दोन्ही मूल्यांची जाणीव करून देतात. बदलत्या काळात रक्षाबंधनाचा हा व्यापक अर्थ समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते; कारण संरक्षण ही केवळ एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीबद्दलची जबाबदारी नसून कुटुंब, समाज आणि निसर्गाप्रति असलेले आपले कर्तव्यही आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news