रायगड : कोकण आणि पुणे यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून पुणे जिल्ह्यातील राजगड (वेल्हे) ते रायगड (महाड) या 18 किलोमीटर लांबीच्या नवीन रस्त्याला शासनाची प्रशासकीय मंजुरी आणि पहिल्या टप्प्यात 25 कोटी 32 लाख रुपयांचा निधी मिळूनही गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे.
राजगड (वेल्हे) ते रायगड (महाड) हा रस्ता पूर्ण झाल्यास पुणे ते रायगड आणि अर्थातच कोकणात पोहोचण्यातील अंतर आणि वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. मात्र, कोकणातील विशेषतः रायगड मधील लोकप्रतिनिधींच्या पाठपूराव्या अभावी हे काम रखडले असल्याचे समोर आले आहे.
हा प्रस्तावित रस्ता पुणे जिल्ह्यातील वेल्हे खुर्द ते भोरडी फाटा ते रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यांतील शेवते असा एकूण 18 किलोमीटर लांबीचा आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून आणि पायथ्यापासून उंच भागातून हा रस्ता जाणार आहे.
पर्यटन सर्कीटचा मार्ग सद्यस्थितीत पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना महाड किंवा रायगडला जाण्यासाठी ताम्हिणी घाट किंवा महाबळेश्वरमार्गे मोठा वळसा घालून जावे लागते. हा रस्ता झाल्यास थेट वेल्हे तालुक्यातून महाड परिसरात प्रवेश करता येईल. परिणामी वेळ आणि इंधनाची मोठी बचत होवू शकणार आहे.
किल्ले राजगड, तोरणा आणि किल्ले रायगड या ऐतिहासिक किल्ले या मार्गामुळे अधिक जवळ येतील. तसेच मढे घाटाजवळून जाणाऱ्या या मार्गामुळे पर्यटनाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.
किल्ल्यांचे एक नवे पर्यटन सर्कीट यातून तयार होवू शकतेय राजगड (वेल्हे) ते रायगड (महाड) हा रस्ता पुणे आणि कोकणातील नागरिकांसाठी अत्यंत सोयीचा ठरणार असल्याने, रखडलेल्या तांत्रिक अडचणी तातडीने सोडवून हे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.
रस्त्याची कामे ठप्प
18 किलोमीटर रस्त्यापैकी दुसऱ्या टप्प्यातील 13 किलोमीटरच्या कामासाठी पुण्यातील माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 25 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. निधी उपलब्ध असूनही तांत्रिक अडचणी आणि इतर कारणांमुळे या रस्त्याचे काम गती घेऊ शकलेले नाही. सुरुवातीला जेमतेम 2 किलोमीटरचे काम झाले, परंतु त्यानंतर पुढील काम पूर्णपणे बंद पडले आहे.