सुनील सकटे
कोल्हापूर : कळे-गगनबावडा रस्ता दुपदरीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदार निश्चित झाला आहे. लवकरच वर्कऑर्डर होणार असल्यामुळे कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या मार्गाच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 22 गावांतील 18 हेक्टरपैकी बहुतांश जमिनीची मोजणी पूर्ण केली. दुपदरीकरणाठी 450 कोटी रुपयांचा प्रस्ताव ऑक्टोबर महिन्यात पाठविला. त्यास आता हिरवा कंदील मिळाल्याने 351 कोटी रुपयांची निविदा जाहीर झाली. या कामासाठी सुमारे 20 हून अधिक ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदारही निश्चित झाला. ठेकेदाराच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन लवकरच वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. त्यानंतर तातडीने काम सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे.
या मार्गावर अनेक वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य आहे. वारंवार पॅचवर्क करून कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जामुळे दुपदरीकरण करून रुंदीकरणाचे नियोजन आहे. हा घाटरस्ता असल्याने अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आणि तीव्र उतार आहेत. त्यामुळे वारंवार अपघात होतात. भूसंपादनासाठी मार्गावरील 22 गावांतील 18 हेक्टर जमीन आवश्यक आहे. भूसंपादनाचे बहुतांश काम पूर्णत्वास आले आहे.
कोल्हापूर-वैभववाडी रस्ता होणार चकाचक
कोल्हापूर-कळे रस्त्याचे दुपदरीकरण अंतिम टप्प्यात आहे; तर करुळ घाट रस्ता पूर्ण झाला आहे. त्यामुळे केवळ कळे ते कोल्हापूर या अंतरातील रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आता या रस्त्याचे दुपदरीकरण होणार असल्याने कोल्हापूर-वैभववाडी रस्ता चकाचक होणार आहे.
येथील वळणे काढणार
आसगाव, खडुळे, तिसंगी, साळवण, मांडुकली, शेणवडे, मार्गेवाडी, खोकुर्ले, आसळज, पळसंबे, सैतवडे, सांगशी येथील वळणे काढणार आहेत.