पनवेल ः प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल दि. बा. पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका करणाऱ्या तसेच नामदेव गायकवाड गुरुजी यांना जातीवाचक शब्दांनी अपमानित केल्याबद्दल शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अखेर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमनुसार उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विमानतळाचे उदघाटन झाल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल दि.बा. पाटील यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली होती. त्यामुळे राजेंद्र पाटील यांच्यावर भूमिपुत्रांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. याच विमानतळाच्या अनुषंगाने बौद्ध समाजाचे नामदेव गायकवाड गुरुजी यांनी विमानतळबाधित पुनर्वसन या विषयावर वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. मात्र राजेंद्र पाटील यांनी मुलाखतीचा संदर्भ देत गायकवाड गुरुजींविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे. या प्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राजेंद्र पाटील यांच्यावर उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उलवे मध्ये राहणारे नामदेव रामचंद्र गायकवाड हे बौद्ध समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून पेन्शनमधून उदरनिर्वाह चालवतात. शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त झाल्यानंतर शेकापचे त्यांनी काम केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उलवेचा झालेल्या विकासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामाचे कौतूक केले होते.
राजेंद्र महादेव पाटील यांनी रेतिबंदर परिसरात वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना मुलाखतीस अनुसरुन राजेंद्र पाटील यांनी ’लाचार होवून अर्धा किलो मटणासाठी गेलेल्या गायकवाड गुरुजींचा धिक्कार करतो’ असे अपशब्द वापरुन जाहिरपणे र वक्तव्य करुन हेतूपुरस्सर अपमान केला आहे. राजेंद्र पाटीलवर गायकवाड गुरुजींनी अखेर उलवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
लोकनेते दि. बा. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य भूमिपुत्रांच्या हक्कासाठी वेचलं. त्यांच्या कुटुंबाचा आणि समाजातील ज्येष्ठांचा अपमान हा संपूर्ण भूमिपुत्र समाजाचा अपमान आहे. भूमिपुत्र एकसंघ आहे, त्यामुळे आमच्या नेत्यांचा आणि समाजातील ज्येष्ठांचा अपमान करण्याचा अधिकार राजेंद्र पाटील यांना नाही. आजही अनेक ठिकाणी दलित आणि मागासवर्गीय समाजातील लोक अन्याय आणि अपमान सहन करत आहेत. अशा परिस्थितीत राजकीय स्थान असलेल्या व्यक्तींकडून जर असा प्रकार घडत असेल, तर त्यावर प्रशासनाने अधिक कडक भूमिका घेतली पाहिजे.रुपेश धुमाळ, भाजप पदाधिकारी