SHKP MNS Political Strategy Canva
रायगड

Raj Thackeray | शेकापच्या मंचावर राज ठाकरे, रायगडमध्ये नव्या समीकरणांची 'राज'नीती'?

Raj Thackeray | शेकापसाठी यंदाचा वर्धापन दिन मेळावा केवळ एक उत्सव नसून, तो अस्तित्वाच्या लढाईचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

पुढारी वृत्तसेवा

SHKP MNS Political Strategy

जयंत धुळप, रायगड

रायगडच्या राजकीय पटलावर एका नव्या आणि अनपेक्षित अध्यायाची नांदी होण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत कलह आणि मोठ्या गळतीने ग्रासलेला शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आपल्या ७८ व्या वर्धापन दिनी एक मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहे.

शनिवारी (दि. ०२) नवीन पनवेल येथे होणाऱ्या या मेळाव्याच्या मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शेकापच्या लाल बावट्याच्या कार्यक्रमात महायुतीचे समर्थक असलेले राज ठाकरे काय बोलणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले असून, ही घडामोड रायगडमधील नव्या राजकीय समीकरणांचे संकेत देत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

पक्षांतर्गत कलह आणि गळतीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व

शेकापसाठी यंदाचा वर्धापन दिन मेळावा केवळ एक उत्सव नसून, तो अस्तित्वाच्या लढाईचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षी पंढरपूर येथील मेळाव्यात सरचिटणीस जयंत पाटील आणि त्यांचे बंधू पंडित पाटील यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. यानंतर पाटील कुटुंबातील अंतर्गत कलह इतका विकोपाला गेला की, माजी आमदार पंडित पाटील, ॲड. आस्वाद पाटील यांच्यासह अनेक प्रमुख सदस्यांनी पक्षाला 'रामराम' ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

या फुटीची जखम ताजी असतानाच, पेणचे माजी आमदार आणि विद्यमान खासदार धैर्यशील पाटील यांनीही भाजपची वाट धरली. नुकतेच पनवेलमधील पक्षाचे खंदे आधारस्तंभ मानले जाणारे जे. एम. म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने शेकापला मोठा धक्का बसला आहे. या मोठ्या गळतीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे आणि पक्षाची ताकद दाखवून देण्याचे मोठे आव्हान जयंत पाटील यांच्यासमोर आहे.

राज ठाकरेंच्या उपस्थितीमागे दडलंय काय?

शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. मात्र, राज ठाकरे यांना निमंत्रित करण्यामागे केवळ व्यक्तिगत स्नेह नाही, तर एक धोरणात्मक राजकारण दडलेले दिसते. 'भूमिपुत्रांचे हक्क' आणि 'स्थानिकांचे प्रश्न' हा शेकाप आणि मनसे यांच्यातील समान धागा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, रायगडमध्ये एक नवी राजकीय आघाडी उभी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. महाविकास आघाडीत राहूनही, स्थानिक पातळीवर मनसेसोबत हातमिळवणी करून शिंदे गट आणि भाजपला शह देण्याची ही 'बेरजेची राज'नीती' असू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.

शेकापची भूमिका गुलदस्त्यात; पहिला शत्रू शिंदे गट

एकीकडे नव्या समीकरणांची चर्चा सुरू असताना, शेकापच्या भूमिकेने उत्सुकता आणखी वाढवली आहे. पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी स्पष्ट केले की, "आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लाल बावट्याखालीच लढणार आहोत. आमचा एक नंबरचा शत्रू शिंदे गट आहे. सध्याचे राजकारण चुकीच्या विषयांवर सुरू असून, स्थानिकांचे प्रश्न बाजूला पडले आहेत. निवडणुकीच्या वेळी आमचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील."

या वक्तव्यातून शेकाप आपली भूमिका पूर्णपणे उघड करू इच्छित नाही, हे स्पष्ट होते. मात्र, एकाच वेळी शिंदे गटाला लक्ष्य करणे आणि राज ठाकरे यांना मंचावर आणणे, यातून शेकाप भविष्यातील राजकारणासाठी सर्व पर्याय खुले ठेवत असल्याचे संकेत मिळत आहेत.

एकंदरीत, पक्षाला लागलेली गळती रोखण्याचे आव्हान आणि नव्या मित्रांना सोबत घेऊन राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न, या दुहेरी रणनीतीवर शेकाप काम करत आहे. या मेळाव्यातून रायगडच्या राजकारणाला नेमकी कोणती दिशा मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे, हे मात्र निश्चित.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT