

म्हसळा ः वृद्ध महिला घरात एकटीच असल्याचे पाहून चोरीसाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी वृद्धेचा गळा आवळून खून करुन तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची खळबळजनक घटना म्हसळा येथे घडली. सदर चोरीप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र,दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने त्यांना कायद्याच्या विधीसंघर्षित या संज्ञेअंतर्गत ताब्यात घेतले आहे.
शेवंती सखाराम भावे (वय 75) असे या वृद्धेचे नाव असून ती घरी असताना दुपारी दोन लहान मुले घरात शिरली. आजी एकटीच असल्याचे पाहून या दोघांपैकी एका मुलाने तिचा हात धरला तर दुसर्या मुलाने तिचे तोंड दाबून धरले. श्वास कोंडल्याने ती वृध्द महिला मृत झाल्याचे पाहून या दोन मुलांनी तिच्या कानातील बुगड्या, सोन्याच्या साखळ्या आणि डोरले असा सुमारे 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने काढून घेत तेथून पलायन केले.
घरातील व्यक्तींना ही वृद्धा नैसर्गिकरित्या मृत्यू पावल्याचे वाटल्याने त्यांनी जास्त गाजावाजा न करता तिच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र,त्यानंतर दोन दिवसांनी या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने दिसून न आल्याने तिच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली जाऊ लागली.
मृत वृद्धेचा मुलगा सुरेश सखाराम भावे यांनी 26 जुलै रोजी म्हसळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असता उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कहाले आणि त्यांच्या पथकाने शिताफीने शोध घेऊन या प्रकरणात 16 व 17 वर्षांची ही दोन मुले ताब्यात घेतली.
या अल्पवयीन आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 103,311(5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना कर्जत येथील बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे.
मृत वृद्ध महिलेचा खून आम्ही कसा केला याची कबुली या दोन्ही अल्पवयीन मुलांनी दिली आहे. दरम्यान लंपास केलेले सोन्याचे दागीने त्यांनी गोरेगांवमधील एका सोनारास विकले असल्याचे सांगितले. त्यानुसार त्या सोनाराकडून ते दागीने ताब्यात घेण्यात आले आहेत. या प्रकरणात अधिक तपास फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती या गुन्ह्याचा तपास करत असलेले म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक एस. ए. कहाळे यांनी दिली आहे.