Raj Thackeray Raigad press conference : "स्थानिक आमदारांच्या हस्तक्षेपामुळे विकासकामे मार्गी लागत नाहीत. मागे मी मुंबई- गोवा महामार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन केला होता, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की 'कंत्राटदार वैतागून निघून गेले.' नितीन गडकरी जर कोकणातल्या कंत्राटदारांबद्दल असे बोलत असतील, तर ते कशामुळे कंटाळले? रस्ते बनवताना हेच प्रश्न वारंवार समोर येतात. पैसे गेले आणि कंत्राटही गेले! कोणतीही दूरदृष्टी न ठेवता, केवळ टक्केवारी कशी मिळेल हेच व्यवहार सध्या सुरू आहेत, अशा शब्दांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा साधला. तुम्ही कोणालातरी जमीन विकणार, उद्या ती जमीन अदाणीच्या घशात जाणार. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या गोष्टीला ठाम विरोध करणे गरजेचे आहे. आपल्या पायाखालची जमीन निसटत चालली आहे, याचे भान ठेवून स्थानिकांनी जमिनी विकू नयेत, असे आवाहनही त्यांनी रायगड येथील पत्रकार परिषदेत केले.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, "सध्या राज्यभरात दुसरी मुंबई, तिसरी मुंबई असे प्रकल्प जाहीर केले जात आहेत. या तिसऱ्या मुंबईत नक्की काय येणार आहे? तर एज्युकेशनल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर, संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे! मात्र, इथे नक्की काय आणले जात आहे, याची स्पष्ट माहिती महाराष्ट्रातील जनेतला दिली जात नाही. आपल्याकडचा जो मूळ जमीनदार आहे, तो उद्या केवळ 'माजी जमीन मालक' म्हणूनच उरणार आहे. त्याच्या डोळ्यांसमोर तिसरी मुंबई उभी राहील. आज पुण्याची काय अवस्था झाली आहे ती सर्वांसमोर आहे. स्थानिकांना उद्ध्वस्त करण्याचेच काम सध्या सुरू आहे."
"जमीन विकणे हाच एकमेव धंदा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. विशेषतः कोकणात हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. स्थानिकांना उद्ध्वस्त करण्याचे काम सध्या चालू आहे. आपली जमीन, आपले पाणी आणि आपली वीज... मग यावर पोसले कोण जाणार? तर बाहेरचे लोक! जर महाराष्ट्राच्या हिताशी संबंधित प्रगतीच होत नसेल, तर काय चाटायची ती प्रगती? नक्की कोणासाठी हे सगळं सुरू आहे? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
पालकमंत्री ही संकल्पना अत्यंत फालतू आहे. पालक म्हणजे आई-बाप, मग यांना आपण आई-बाप मानायचे का? सरकारने अशा गोष्टींचे निर्णय थेट घ्यायचे असतात. आपल्या मुला-मुलींना कोणत्या प्रकारचे रोजगार मिळणार आहेत, याची कोणाला काहीच माहिती नाही. सर्वकाही लपवून ठेवले जात आहे. १५ वर्षे झाली तरी कामे पूर्ण होत नाहीत; आजही तीच बिकट परिस्थिती आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून हेच सुरू आहे, कोणतेही नवीन विषय समोर येत नाहीत. 'आम्ही पाणी देऊ, रस्ते देऊ' एवढ्यापुरताच विकास सीमित ठेवला गेला आहे. आमचा विकासाला विरोध नाही, पण माणसाला अंधारात ठेवू नका, असे राज ठाकरे म्हणाले.
तुमचे अस्तित्व हे केवळ तुमच्या जमिनीवर टिकून आहे. एकदा जमीन विकली की तुमचा विषय तिथेच संपला, असा गंभीर इशारा देत राज ठाकरे यांनी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. आपल्या कोकणाचा पुढे काय होणार, याचा सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे. सगळे एकत्र आले तर असा अन्याय होणार नाही. यासाठी सत्ताबदल आणि माणसे बदलणे अत्यंत गरजेचे आहे. जे निवडून येतात, त्यांना रस्ता खराब आहे की चांगला, याच्याशी काहीही देणेघेणे नसते. जोपर्यंत त्यांना धक्के दिले जात नाहीत, तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक बदल घडणार नाही, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.