Torrent Power project Pudhari
रायगड

Torrent Power project: सह्याद्री वाचवण्यासाठी राज ठाकरेही मैदानात

टोरंट पॉवरच्या वृक्षतोडीविरुद्ध रान पेटणार; प्रकल्पांचा निर्णय बाहेरच्यांनी नव्‍हे, महाराष्ट्राने घ्यावा : राज ठाकरे

पुढारी वृत्तसेवा

आनंद सकपाळ

नेरळ: कर्जत तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीतील साई डोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवरच्या पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सरकारवर जोरदार टीका केली.

साई डोंगर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि विविध राजकीय पक्षांकडून विरोध होत आहे. यापूर्वी शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनीही या परिसराची पाहणी करून वृक्ष तोडीवर प्रश्न उपस्थित केले होते.

राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे साई डोंगरातील वृक्षतोडीचा मुद्दा स्थानिक आंदोलनापुरता मर्यादित न राहता राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार असल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे.

उपलब्ध वृत्तांनुसार प्रस्तावित ३ हजार मेगावॅट पंप्ड स्टोरेज प्रकल्पासाठी ३२ हजार ४९० झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी बुधवारी साई डोंगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून जाहीर सभेत प्रकल्पाची गरज, पर्यावरणाचा ऱ्हास, राज्यातील राजकीय नेतृत्वाची भूमिका आणि महाराष्ट्रातील नैसर्गिक साधन संपत्तीबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

‘मी जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय’

साई डोंगरातील वृक्षतोडीचा संदर्भ देताना राज ठाकरे यांनी, “मी जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय असे वाटते. या प्रकल्पाची काय गरज आहे, याचा विचार करा,” असे म्हणत प्रकल्पाच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय परिणामांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मी उद्योगधंद्यांच्या विरोधात नाही. मात्र महाराष्ट्रात काय करायचे हे बाहेरच्यांनी ठरवायचे नाही; आम्ही ठरवू,” असे राज यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT