वरसोली येथील इंग्रजी भाषा प्रयोगशाळेचे उद्घाटन रोजगार हमी योजना व फलोद्यान मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. Pudhari
रायगड

Raigad ZP Schools | रायगडमधील १२२ शाळांमध्ये अत्याधुनिक इंग्रजी भाषा प्रयोगशाळा; ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम

वरसोली येथील इंग्रजी भाषा प्रयोगशाळेचे उद्घाटन रोजगार हमी योजना व फलोद्यान मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते

पुढारी वृत्तसेवा

Raigad Zilla Parishad Initiative

अलिबाग : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १२२ जिल्हा परिषद शाळांमध्ये अत्याधुनिक इंग्रजी भाषा प्रयोगशाळांचे लोकार्पण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधारित आणि आधुनिक इंग्रजी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळा, वरसोली येथील इंग्रजी भाषा प्रयोगशाळेचे उद्घाटन रोजगार हमी योजना व फलोद्यान मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधारित आणि स्पर्धात्मक करण्यासाठी १२२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी भाषा प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. यापैकी ६६ शाळांमध्ये जिल्हा परिषद अर्थसंकल्प २०२५-२६ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून, तर ५६ शाळांमध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. या १२२ शाळांमध्ये वरसोली जिल्हा परिषद शाळेचाही समावेश आहे.

आजच्या डिजिटल युगात इंग्रजी ही केवळ संवादाची भाषा न राहता उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, रोजगाराच्या संधी आणि जागतिक ज्ञानव्यवस्थेशी जोडणारे महत्त्वाचे कौशल्य ठरले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक भाषा शिक्षणाच्या समान सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. इंग्रजी भाषा प्रयोगशाळांमुळे विद्यार्थ्यांच्या श्रवण, संभाषण, उच्चार आणि शब्दसंपदा या कौशल्यांचा विकास होण्यासोबतच त्यांच्या आत्मविश्वासातही वाढ होईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि शिक्षकांचे समर्पित प्रयत्न यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी अधिक सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि स्पर्धात्मक बनतील, असे नमूद केले. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी इंग्रजी भाषा प्रयोगशाळेची माहिती देताना सांगितले की, प्रयोगशाळांमध्ये संगणक, हेडसेट, डिजिटल भाषा शिक्षण सॉफ्टवेअर तसेच उच्चार, श्रवण आणि संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्वयंगतीने सराव करता येणार असून, योग्य उच्चारांचे मार्गदर्शन, संवादकौशल्याचा विकास आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील इंग्रजी भाषा शिक्षण अधिक परिणामकारक होण्यास मदत होईल.

रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये श्रवण, आकलन, संभाषण, उच्चार, शब्दसंपदा, आत्मविश्वास तसेच डिजिटल शिक्षण कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या आधुनिक सुविधांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकण्यासाठी अधिक सक्षम वातावरण मिळून जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT