रायगड ः रायगड जिल्हयात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत एक हजार 45 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी या अर्जांची छाननी प्रक्रीया उशिरापर्यंत सुरु होती. त्यामुळे या छाननीत कोणाचे उमेदवारी अर्ज बाद होतात हे महत्वाचे ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 27 जानेवारीपर्यंत मुदत आहे.
दोन दिवस सार्वजनिक सुट्ट्या असल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तीन दिवस मिळणार आहेत, त्यामुळे या मुदतीत कोण-कोण उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतात आणि कशा प्रकारे जिल्ह्यात निवडणूक लढतीचे चित्र तयार होते, याकडे संपूर्ण रायगडचे लक्ष लागले आहे.
रायगड जिल्ह्यातील 59 जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या 118 गणांसाठी निवडणूक होत आहे. 16 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदावारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. जिल्हयात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल अशी असे सांगितले जात असले तरी युती आणि आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत शेवटपर्यंत चर्चा सुरु होत्या.
जागा वाटप निश्चित होत नसल्याने काही ठिकाणी परस्पर विरोधात उमेदवारी अर्ज दाखल झाले. सुरुवातीच्या दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उमेदवारांनी प्रतिसाद दाखविला नाही. मात्र शेवटच्या तीन दिवसात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांमध्ये उत्साह दिसून आला.
जिल्ह्यातील 118 पंचायत समिती गणांसाठी एकूण 678 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात पुरुष उमेदवार 342 असून महिला उमेदवार 336 आहेत. पनवेल तालुक्यात 83, कर्जत- 71, खालापूर - 39, सुधागड- 22, पेण- 59, उरण - 45, अलिबाग- 96, मुरुड- 28, रोहा- 65, तळा- 17, माणगाव- 38, म्हसळा- 21, श्रीवर्धन- 28 , महाड- 42, पोलादपूर येथे 24 अर्ज दाखल झाले आहेत.
दरम्यान, उमेदावारी अर्ज छाननी प्रक्रिया गुरुवारी सकाळपासून सुरु झाली. अर्ज छाननी वेळी उमेदवारांसह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हयातील किती उमेदवारी अर्ज वैध अथवा अवैध ठरले याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. येत्या 27 जानेवारीपर्यंत उमेदावारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या मुदतीत कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष जागा वाटपात समाधानकारक तोडगा न निघाल्याने काही ठिकाणी एकमेकांविरोधात गेले होते. या जिल्हा परिषद निवडणुकातही जागा वाटपास विलंब होत होता. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे. या दोन दिवसात काय वाटाघाटी होतात, आणि कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो हे महत्वाचे ठरणार आहे.
मित्र पक्षांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकास एक होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. अन्यथा युती, आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेसाठी महिला उमेदवार अधिक
जिल्ह्यातील 59 पंचायत समिती गटांसाठी एकूण 367 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात पुरुष उमेदवार 181 असून महिला उमेदवार 186 आहेत. पनवेल तालुक्यात 40, कर्जत- 40, खालापूर - 23, सुधागड- 12, पेण- 25, उरण - 28, अलिबाग- 56, मुरुड- 11, रोहा- 33, तळा- 9, माणगाव- 28, म्हसळा- 16, श्रीवर्धन- 10 , महाड- 25, पोलादपूर येथे 11 अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद गटांतील निवडणुकासाठी मोठी चुरस पहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपआपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत.