Raigad Anganwadi English Education
अलिबाग : ग्रामीण भागातील बालकांचा शैक्षणिक पाया अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, अंगणवाड्यांमधील मुलांना मातृभाषेसोबत इंग्रजी भाषेची प्राथमिक ओळख करून देण्यात येणार आहे. लहान वयातच इंग्रजीची भीती कमी करून आत्मविश्वास वाढवणे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
रायगड जिल्ह्यात सुमारे ३,१६१ अंगणवाड्या कार्यरत असून, Women and Child Development Departmentमार्फत ‘स्मार्ट अंगणवाडी’ संकल्पना राबवली जात आहे. पोषण आहारासोबतच आता शैक्षणिक गुणवत्तेवरही भर दिला जात असून, यावर्षीपासून मराठीसोबत इंग्रजीची ओळख लहानग्यांना करून देण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीसंख्या सातत्याने घटत असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांत विद्यार्थीअभावी सुमारे ५१ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटना, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. सध्या काही शाळांमध्ये सेमी-इंग्रजी वर्ग सुरू असले तरी अंगणवाड्यांमध्ये इंग्रजी शिक्षण नसल्याने पालक आपल्या मुलांना खासगी पूर्व-प्राथमिक शाळांकडे वळवत असल्याचे निदर्शनास आले.
यावर उपाय म्हणून अंगणवाडी स्तरावरच इंग्रजीचे प्राथमिक धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी शैक्षणिक वर्षात निवडक अंगणवाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवला जाणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व अंगणवाड्यांमध्ये त्याचा विस्तार केला जाणार आहे. या उपक्रमासाठी विशेष अभ्यासक्रम आणि शैक्षणिक साहित्य विकसित केले जाणार आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांप्रमाणेच लहान वयात इंग्रजीचे ज्ञान मिळण्याची संधी मिळेल. पुढील शिक्षणातील अडथळे कमी होऊन विद्यार्थ्यांची प्रगती अधिक सुलभ होईल, असा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.
शिक्षक संघटनांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला. त्यानुसार अंगणवाडीपासूनच इंग्रजी शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापती, महिला व बालविकास सभापती तसेच संबंधित अधिकारी या उपक्रमाबाबत सकारात्मक असून, आवश्यक अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य लवकरच तयार करण्यात येणार आहे.मधुकर पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद रायगड