सुवर्णा दिवेकर
अलिबाग: गावोगावी शिक्षणाचा पाया मजबूत करणाऱ्या जिल्हा परिषद शाळांची रायगड जिल्ह्यातील स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या आणि सरकारी शाळांकडे पालकांचा कमी होत चाललेला कल यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील तब्बल ३६० जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या पाच किंवा त्यापेक्षा कमी आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील २५ जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, १ ते १४ ऑक्टोबर या अवघ्या दोन आठवड्यांत २१ शाळांना टाळे लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
सप्टेंबरअखेर चार शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात आणखी २१ शाळा बंद झाल्याने हा आकडा २५ वर पोहोचला आहे. बंद झालेल्या शाळांमध्ये पेण तालुक्यातील सहा, महाड आणि म्हसळा तालुक्यांतील प्रत्येकी पाच, श्रीवर्धनमधील तीन, मुरुड आणि सुधागडमधील प्रत्येकी दोन, तर माणगाव आणि तळा तालुक्यांतील प्रत्येकी एका शाळेचा समावेश आहे.
आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे तब्बल ३६० जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या पाच किंवा त्यापेक्षा कमी आहे. यामध्ये महाड तालुक्यातील सर्वाधिक ९५ शाळांचा समावेश आहे.
पोलादपूरमध्ये ४६, माणगावमध्ये ४५, रोह्यात ३०, पेणमध्ये २५, तळा आणि म्हसळा येथे प्रत्येकी २५ व २४, मुरुडमध्ये १९, श्रीवर्धनमध्ये १८, अलिबागमध्ये १५, सुधागडमध्ये ११, कर्जतमध्ये चार, पनवेलमध्ये दोन आणि खालापूरमध्ये एका शाळेची पटसंख्या पाच किंवा त्यापेक्षा कमी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सामाजिक आणि शैक्षणिक जीवनाचा केंद्रबिंदू असलेल्या शाळांची ही स्थिती चिंताजनक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा वाढता कल, घटती विद्यार्थीसंख्या आणि सरकारी शाळांबाबत निर्माण झालेला अविश्वास ही त्यामागील संभाव्य कारणे मानली जात आहेत.
गावपातळीवर विद्यार्थीसंख्या वाढविणे, शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे आणि पालकांचा विश्वास पुन्हा संपादन करणे यासाठी शिक्षण विभागाला ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत अन्यथा, कमी पटसंख्येच्या शाळांपुढील संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकरी सुनील भोपळे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.
जिल्ह्यातील आणखी सात शाळांची पडताळणी बाकी
जिल्ह्यातील आणखी सात शाळांच्या ऑनलाइन नोंदींमध्ये विद्यार्थीसंख्या शून्य दिसत असल्याने प्राथमिक शिक्षण विभागाकडून त्यांची पडताळणी केली जात आहे. प्रत्यक्षात विद्यार्थी नसल्यामुळे या शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहेत की ऑनलाइन नोंदींमध्ये तांत्रिक त्रुटी आहेत, याची तपासणी सुरू आहे. त्यामुळे पडताळणीनंतर बंद शाळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे